मिरामार सौंदर्यीकरणाच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण; नोव्हेंबरपर्यंत सर्व काम पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 14:13 IST2020-09-10T14:12:59+5:302020-09-10T14:13:21+5:30
आमदार बाबुश मोन्सेरात, महापौरांकडून पाहणी

मिरामार सौंदर्यीकरणाच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण; नोव्हेंबरपर्यंत सर्व काम पूर्ण होणार
पणजी : मिरामार सौंदर्यीकरणाच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून स्थानिक आमदार बाबुश मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर तसेच ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकाºयांनी या कामाची काल संयुक्त पाहणी केली.
सौंदर्यीकरणाच्या या कामाचे उर्वरित तीन टप्पे नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण होतील, असे सांगण्यात आले. इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलॉपमेट लि,चे व्यवस्थापकीय संचालक स्वयंदिप्ता पाल चौधरी तसेच अन्य अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. एकूण १२ कोटी ८७ लाख,४८ हजार ५८७ रुपये खर्च या एकूण प्रकल्पासाठी येणार आहे.
सौंदर्यीकरणाच्या पहिल्या टप्प्यात किनाºयावर व्यायामासाठी खुले जिम्नेशियम, हवेशीर बसण्यासाठी बाकड्यांची सोय केली आहे. दुसºया टप्प्यात ‘फूड कोर्ट’ येणार असून किनाºयावर बसून अन्नपदार्थांचा आस्वाद घेण्याची सोय होईल. किनाºयाच्या प्रवेशव्दाराचा कायापालट केला जाईल. महापौर म्हणाले की, याआधीच्या सौंदर्यीकरण आराखड्यात काही त्रुटी होत्या त्यात आमदार मोन्सेरात यांनी बदल केले आहेत. नोव्हेंबरअखेरपर्यंत सर्व काम पूर्ण केले जाईल.
सायकल रॅली पुढे ढकला - महापालिकेचे पत्र
दरम्यान, इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलॉपमेट लि, तर्फे येत्या १३ रोजी आयोजित सायकल रॅली कोविडच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलावी, असे आवाहन महापालिकेने आयपीएससीडीएल्ला पत्र लिहून केले आहे. रायबंदर ते दोनापॉल असे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महापौर उदय मडकईकर यांनी आयपीएसडीएल्ला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, ‘शहरात कोविडबाधितांचे प्रमाण वाढल्याने येत्या १३ ऐवजी २ आॅक्टोबरपासून गांधी जयंतीदिनापासून ही रॅली सुरु करावी आणि त्यानंतर ठरल्यानुसार दर रविवारी घ्यावी.