दक्षिण गोव्यातील पहिली खाण कार्यान्वित; दरवर्षी साडेसात लाख मेट्रिक टन खनिज उत्खनन होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 11:54 IST2026-02-07T11:54:00+5:302026-02-07T11:54:56+5:30
या खाणपट्ट्यातीव ट्रक वाहतुकदार, मशिनरी मालक तसेच इतर अवलंबितांच्या आशा यामुळे पल्लवित झालेल्या आहेत.

दक्षिण गोव्यातील पहिली खाण कार्यान्वित; दरवर्षी साडेसात लाख मेट्रिक टन खनिज उत्खनन होणार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सांगे तालुक्यात काले येथे सहावा खाण ब्लॉक गुरुवारी सुरु झाला. दक्षिण गोव्यात सुरु झालेला हा पहिला खाण ब्लॉक असून वर्षाकाठी ७ लाख ५० हजार मेट्रिक टन खनिज उत्खनन या ठिकाणी होणार आहे. या खाणपट्ट्यातीव ट्रक वाहतुकदार, मशिनरी मालक तसेच इतर अवलंबितांच्या आशा यामुळे पल्लवित झालेल्या आहेत.
कालें खाण ब्लॉक-४ चे एकूण क्षेत्र १५२.५० हेक्टर एवढे आहे. इ लिलांवात या खाण ब्लॉकची बोली फोमेंतो रिसोर्सस कंपनीने जिंकली होती. राज्यात आतापर्यंत उत्तर गोव्यातच पाच खाण ब्लॉक सुरू झाले होते. पहिल्या टप्प्यात एकूण १२ खाण ब्लॉकचा लिलांव करण्यात आला. पैकी मुळगांव, डिचोली येथील सेसा वेदांता कंपनीचा, शिरगांव येथील साळगांवकर शिपिंग व राजाराम बांदेकर कंपनीकडील मिळून दोन खाण ब्लॉक, अडवलपाल येथील फोर्मेतो ग्रुपकडील आणि कुडणें येथील जेएसडब्ल्यू कंपनीकडील मिळून पाच खाण ब्लॉक सुरू झाले आहेत.
आता दक्षिणेतील कालें ब्लॉक सुरू झाल्याने या एकूण सहा खाण ब्लॉकमधून वर्षाकाठी एकूण ७० लाख मेट्रिक टन खनिज उत्खनन होणार आहे. अधिकृत माहितीनुसार लिलांव झालेल्या खाण ब्लॉककडून सरकारला आजपावेतो २५२.८३ कोटी रुपये महसूल मिळाला. दहा डंपही लिलावात काढले आहेत.
होंडा ब्लॉक लवकरच
खाण खात्याचे संचालक नारायण गाड म्हणाले की, होंडा येथील आणखी एक खाण ब्लॉक एक ते दीड महिन्यात सुरू होईल. हा खाण ब्लॉक अग्रवाल कंपनीकडे आहे. उर्वरित पाच खाण ब्लॉकच्या ईसी, वन खात्याचे परवाने मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य सचिव तसेच मी स्वतः सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आहे.
एप्रिलपर्यंत होणार सहा खाण ब्लॉकचा लिलाव
बारा खाण ब्लॉक व्यतिरिक्त खाण खात्याने ६ जानेवारी रोजी आणखी सहा खाण ब्लॉकचा ई-लिलाव जाहीर केला आहे. या अंतर्गत उत्तर गोव्यातील ५ आणि दक्षिण गोव्यातील १ असे एकूण ६ खनिज ब्लॉक्स ई-लिलावासाठी उपलब्ध केले आहेत. ही लिलांव प्रक्रिया एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल.
उत्तर गोव्यात ई-लिलावासाठी घोषित केलेल्या ब्लॉकमध्ये कुडणें ब्लॉक क्र. १३, कुडणें ब्लॉक क्र. १४, पिसुर्ले ब्लॉक क्र. १५, पिसुर्ले ब्लॉक क्र.१६, अडवलपाल ब्लॉक क्र. १७ व दक्षिण गोव्यातील कावरें-मायणा ब्लॉक क्र. १८ चा समावेश आहे.