अग्निशामक कर्मचाऱ्यांना आता 'जोखीम भत्ता' देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 13:00 IST2025-04-15T12:59:27+5:302025-04-15T13:00:19+5:30
अग्निशामक सेवा दिनानिमित्त जवानांचा गौरव

अग्निशामक कर्मचाऱ्यांना आता 'जोखीम भत्ता' देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील अग्निशामक दलाचे कार्य कौतुकास्पद आहे. येथील जवान आपल्या जिवाची पर्वा न करता आपत्कालीन स्थितीत लोकांबरोबर मालमत्ता वाचविण्यासाठी धडपडत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन व त्यांच्या मागणीचा विचार करून अग्निशामक दलातील जवानांना 'जोखीम भत्ता' देण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनानिमित्त सोमवारी सांतीनेज येथील अग्निशामक दलाच्या मुख्यालयात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्य सचिव व्ही. कांडावेलू, अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
इमारती उभारताना तसेच उद्योगांच्या उभारणीवेळी अग्नी सुरक्षा प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. याबाबत अग्निशामक दलातर्फे वारंवार पाठपुरावा करण्यात येतो. परंतु, अनेकांना ती छळवणूक वाटते. गेल्या वर्षात दलाने विविध घटनांमध्ये ३९८ जणांचे जीव वाचविले आहेत तर यासोबत ४४ कोटी रुपयांची मालमत्ता देखील वाचवली आहे, असे डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले.
११ सायक्लोन शेल्टर
राज्यात अग्निशामक दलाने केंद्र सरकारच्या साहाय्याने ३४० कोटी रुपये खर्च करून ११ ठिकाणी सायक्लोन शेल्टर (आपत्ती निवारन केंद्र) उभारले आहेत. एवढेच नाही तर येथे आधुनिक यंत्रणा देखील उपलब्ध करून दिली आहे. अशी सायक्लोन शेल्टर असणारे गोवा हे देशातील पाहिले राज्य ठरले आहे. त्याचप्रमाणे दलाने ३५० आपदा मित्र सेवेत घेत त्यांना आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे, असेही डॉ. सावंत यांनी अधिक माहिती देताना सांगितले.