गोव्यात फॉर्मेलिनप्रकरणी एफडीएने पुन्हा नाड्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 20:18 IST2019-06-20T20:16:38+5:302019-06-20T20:18:49+5:30
कडक तपासणी : चेक नाक्यांवरुन वाहने परत पाठवली

गोव्यात फॉर्मेलिनप्रकरणी एफडीएने पुन्हा नाड्या आवळल्या
पणजी : गोव्यात परराज्यातून फॉर्मेलिनयुक्त मासळी विक्रीसाठी येऊ नये यासाठी एफडीएने पुन्हा एकदा नाड्या आवळल्या आहेत. राज्यात मासेमारीबंदीचा काळ असल्याने शेजारी महाराष्ट्रातून रत्नागिरी तसेच अन्य भागातून इतकेच नव्हे तर कर्नाटक, केरळ, तामीळनाडूतून गोव्यात मासळी पाठवली जाते. चेक नाक्यांवर मासळीवाहू वाहने अडवून क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया तसेच अन्न व औषध प्रशासन अधिकारी मासळीची तपासणी करीत आहेत. पोळें व पत्रादेवी येथे तपासणी करुन गेल्या काही दिवसात अनेक मासळीवाहू वाहने माघारी पाठवण्यात आली.
मासळीचे नमुने तपासले परंतु कोठेही फॉर्मेलिनयुक्त मासळी सापडलेली नसल्याचा दावा सरकारी सूत्रांनी केला आहे. राज्य सरकारने मासळीवाहू ट्रक, पिकअप आदी वाहने इन्सुलेटेट असणे सक्तीचे केले आहे तसेच या वाहनांना मासळीच्या वाहतुकीसाठी एफडीएचे परवानेही अनिवार्य केले आहेत. काही वाहने इन्सुलेटेड नसतात तसेच एफडीए किंवा अन्य यंत्रणांचे परवानेही त्यांच्याकडे नसतात. आवश्यक ते परवाने तसेच दस्तऐवज नसल्याने ही वाहने परत पाठवण्यात आली.
क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडियाने चेक नाक्यांवर कार्यालयेच थाटली असून पुढील काळात २४ तास मासळीवाहू वाहनांची तपासणी केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन अधिकारीही तपासणीच्यावेळी प्रत्यक्ष उपस्थित असतात. पोलिस किंवा वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांशी समन्वयाबाबत एफडीए क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करीत आहे.
गेल्या वर्षी जुलैमध्ये फॉर्मेलिनयुक्त मासळीचा प्रश्न ऐरणीवर आला होता त्यानंतर काही काळ परप्रांतातून गोव्यात येणाऱ्या मासळीवर बंदी घालण्यात आली. परंतु नंतर काही दस्तऐवज व परवाने सक्तीचे करुन ही बंदी उठविण्यात आली. फॉर्मेलिन हे रसायन मानवी मृतदेह टिकून रहावा यासाठी मृत माणसाच्या शरीराला लावले जाते. हेच रसायन मासळी टिकून रहावी यासाठी वापरले जात असल्याचे आढळून आल्याने परराज्यातून गोव्यात येणाऱ्या मासळीच्याबाबतीत राज्य सरकारने कडक धोरण अवलंबिले आहे. सध्या गोव्यात मासेमारीबंदी असल्याने येथे मासळीचे दर गगनाला भिडले आहेत.