देणग्या नसल्या तरी आम्ही पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर चालवतोय: सुदिन ढवळीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 11:12 IST2025-12-25T11:11:54+5:302025-12-25T11:12:16+5:30
झेडपीमध्ये मगोचे १०० टक्के यश; विधानसभेच्या तयारीचे आवाहन

देणग्या नसल्या तरी आम्ही पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर चालवतोय: सुदिन ढवळीकर
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी युतीची बोलणी होत असताना आम्हाला किमान सहा जागा मिळाव्यात, अशी आमची इच्छा होती. मात्र ज्या तीन जागा मिळाल्या त्यावर आम्ही समाधान व्यक्त केले. त्या तिन्ही जागा विक्रमी मतांनी निवडून आणल्या व शंभर टक्के यश संपादन केले. जर सहा जागा मिळाल्या असत्या तर सहा जागांवरही आम्ही विजय संपादन केला असता, असा विश्वास वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केला.
जिल्हा पंचायत निवडणुकीतील विजयाच्या पार्श्वभूमीवर मगो कार्यकर्त्यांसाठी बुधवारी कृतज्ञता सोहळा बांदोडा येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. मगो पक्षाला आता पूर्वीप्रमाणे कुणाच्या देणग्या मिळत नाहीत. पण आम्ही पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर प्रामाणिकपणे पक्ष चालवतोय, असेही ढवळीकर म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर मगोप अध्यक्ष दीपक ढवळीकर, मडकई मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, केरीच्या सरपंच, मगो कार्यकारिणीचे काही सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. मंत्री ढवळीकर म्हणाले की, पक्ष, संघटना चालवणे हे तेवढे सोपे काम नाही. मात्र कार्यकर्त्याच्या योगदानावर पक्ष ताठ मानेने उभा आहे. काही वर्षांपूर्वी आम्हाला इतर पक्षांप्रमाणेच देणग्या मिळत होत्या. मात्र आज आम्हाला देणग्या मिळत नाहीत. तरीसुद्धा निस्वार्थ कार्यकर्त्यांचे पाठबळ आमच्याकडे आहे व त्यावरच आम्ही आज चांगली घोडदौड सुरू ठेवली आहे. मगो पक्षाच्या कार्यकर्त्यांना पैशाची हाव नाही. पक्ष श्रेष्ठ भावना ठेवून कार्यकर्त्यांनी झेडपी निवडणुकीत काम केले. म्हणूनच दक्षिण गोव्यातील सर्वाधिक मते मगोला मिळाली व दक्षिण गोव्यातील सर्वाधिक मताधिक्य सुद्धा मगो पक्षाला मिळाले.
पैशांची देवाण-घेवाण करून पक्ष मोठा होत नसतो तर लोकांची कामे करूनच पक्ष मोठा होत असतो, हे तत्व आम्ही पाळत आलो आहोत. या निवडणुकीत आमच्या काही कार्यकर्त्यांमधील मतभेद उघड झाले आहेत. त्यावर आम्ही निश्चित तोडगा काढू व ज्या ठिकाणी कमी मते मिळाली आहेत त्या ठिकाणी आमच्या हक्काच्या मतांमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करू. मात्र त्यासाठी कार्यकर्त्यांचे सहकार्य आवश्यक आहे.
आरजी पक्ष हा सुरुवातीपासूनच लोकांची दिशाभूल करत आलेला आहे. खोटारडेपणा हा त्यांचा स्थायीभाव आहे. आजपर्यंत त्या पक्षाच्या नेत्यांनी काही चांगले केले आहे, असे मला तरी वाटत नाही.
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची बांधणी करत आहोत. कार्यकर्त्यांनी आपले मतभेद विसरून पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र यावे. पक्ष शिस्त प्रत्येकाने पाळली नाही तर पक्षात फूट पडू शकते.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही भाजपबरोबर युती करूनच पुढे जाणार आहोत. ज्या जागा आम्हाला मिळतील त्या आम्ही सर्वाधिक मतांनी निवडून आणूया, असेही मंत्री ढवळीकर म्हणाले. यावेळी जिल्हा पंचायत निवडणुकीत निवडून आलेले गणपत नाईक, आदिती गावडे व अपक्ष निवडून आलेले सुनील जल्मी यांचा सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
'त्या' आमदाराला साथ देणारच नाही...
झेडपी निवडणुकीत आम्ही युतीच्या धर्माचे पालन केले आहे. मात्र भाजपच्या 'त्या' आमदाराबरोबर आम्ही राहणार नाही, याची कल्पना आम्ही संबंधित नेत्यांना दिली होती. 'त्या' आमदाराने मगो पक्षाच्या निशाणीला शिव्या दिल्या होत्या व ते आम्ही विसरलेलो नाही आणि कदापी विसरणार नाही. परंतु आम्ही कोणत्याच कार्यकर्त्यांना युतीच्या प्रचाराला जाण्यापासून अडवले नाही. प्रचाराला जायचे की नाही हा निर्णय आम्ही सर्वतोपरी कार्यकर्त्यावर सोडला होता, असे ढवळीकर म्हणाले.
बेतकी-खांडोळाही जिंकलो असतो...
मगोचे प्रदेश अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले की, मगो पक्ष हा शिस्तबद्ध पद्धतीने काम करत असतो. उमेदवारी देताना सुद्धा आम्ही त्याचे तंतोतंत पालन केले. बेतकी खांडोळा सुद्धा आम्हाला मिळाला असता मात्र स्थानिक आमदाराने त्याला विरोध केला. आज तिथे निवडून आलेले सुनिल जल्मी हे आमचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते आहेत. स्वतःच्या हिमतीवर त्यांनी तिथे विजय संपादन केला त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन.