शाश्वत सुविधांबरोबर पर्यावरण गरजेचे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 12:01 IST2026-02-12T11:59:47+5:302026-02-12T12:01:50+5:30
वाळपईतील अग्निशामक दलाच्या नव्या सुसज्ज इमारतीचे दिमाखात लोकार्पण

शाश्वत सुविधांबरोबर पर्यावरण गरजेचे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव : 'शाश्वत विकासाबरोबरच पर्यावरण जतन करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये सामान्य जनतेचेही योगदान महत्त्वाचे आहे. पर्यटन क्षेत्र म्हणून गोव्याची जगामध्ये प्रसिद्धी आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा उभारताना निसर्गाचे जतन करणेही तेवढेच गरजेचे आहे. निसर्ग पर्यटनासाठी पर्यटकांची पावले अभयारण्याच्या दिशेने वळली पाहिजेत, यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक आहे' असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
वाळपई येथील अग्निशामक दलाच्या नूतन वास्तू लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, जिल्हा पंचायत सदस्य प्रेमनाथ दळवी, नामदेव चारी, अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर, नगराध्यक्षा, नगरसेवक, सरपंच, पंच आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'आज मोठ्या शहरांमध्ये स्वच्छ हवा मिळत नाही. त्यामुळे जनतेच्या भल्यासाठी शाश्वत विकास करताना निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सत्तरीतील पर्यावरण, नदी, नाले, डोंगरांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व मी आम्ही दोघेही कटिबद्ध आहोत. अन्न, पाणी, वीज यासारख्या आवश्यक गरजा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.' प्रदीप नाईक यांनी सूत्रसंचालन केले. अग्निशामक दलाचे श्रीपाद गावस यांनी आभार मानले.
साडेसात कोटींचा खर्च
मुख्यमंत्री म्हणाले की, 'अग्निशामक दलाचे जवान नेहमी तंदुरुस्त असावेत, अग्निशामक दलाचे जवान प्रत्येक प्रसंगामध्ये सज्ज असावेत यासाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशा इमारतीची सत्तरीमध्ये गरज होती. साडेसात कोटी रुपये खर्चुन बांधलेल्या या इमारतीमुळे ही गरज पूर्णत्वास गेलेली आहे.'
पंतप्रधानांच्या स्वप्नातील भारत घडवू : राणे
यावेळी बोलताना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सावर्डे-सत्तरी येथील नूतन पुलाच्या बांधकाम संबंधीची प्रक्रिया पुढे नेल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी डबल इंजिन सरकारची गरज आहे. सत्तरीतील जनतेचे आम्हाला सहकार्य लाभत आहे. उद्घाटनाच्या प्रतीक्षेत राहिलेल्या इमारतीचे लोकार्पण केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
नाले, डोंगरांचे संगोपन करणे ही काळाची