उद्योजकता हे गोव्याचे भविष्य: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 07:47 IST2025-11-13T07:46:47+5:302025-11-13T07:47:44+5:30
सुधारित मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेचा प्रारंभ

उद्योजकता हे गोव्याचे भविष्य: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यातील उद्योजकता हे गोव्याचे भविष्य आहे. युवकांनी त्याकडे वळावे. गोवा हे उद्योजकता, स्वयंरोजगारात मॉडेल राज्य म्हणून ओळखले जावे यासाठी राज्य सरकार सतत प्रयत्न करीत आहे. त्याचाच भाग म्हणून ईडीसी अंतर्गत राबवली जाणाऱ्या मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेत सुधारणा केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते सुधारित मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. उद्योजकता हे गोव्याचे भविष्य आहे. मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेद्वारे आम्ही केवळ नोकऱ्या निर्माण करीत नसून रोजगार निर्माण करीत आहोत. हा उपक्रम तरुणांचा, शिक्षकांचा आणि समाजाचा विकास करणारा असून, स्वावलंबनाच्या कल्पनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. यावेळी ईडीसीचे व्यवस्थापकीय संचालक बी. पी. पै आंगले, उद्योग खात्याचे सचिव संतोष सुखदेव, आयएएस अधिकारी अश्विन चंद्रू व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, विविध व्यवसायांच्या माध्यमातून राज्यातील लोक स्वयंरोजगारात आहेत. आज युवकांनीदेखील स्वयंरोजगार, उद्योजकतेकडे वळावे. त्यांच्यात याबाबत जागृती करण्यासाठी तसेच त्यांच्यातील गुण ओळखण्यासाठी महाविद्यालय पातळीवर ईडीसीकडून विशेष उपक्रम राबविला जाणार आहे. यात त्यांना मार्गदर्शनही केले जाईल. सुधारित मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना गोव्यात क्रांती घडवेल, असे त्यांनी नमूद केले. सुधारित मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली व युवकांना या योजनेचा लाभ घेण्याची आवाहन करण्यात आले.
१ हजार ३५० उद्योजक घडवणार
ईडीसीकडून विशेष उपक्रमांतर्गत राज्यात १ हजार ३५० उद्योजक तयार करण्याचा हेतू असून, २९ हजार विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जागृती केली जाईल. सुधारित मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेंतर्गत कर्ज देताना व्याजदरात सवलत दिली जाईल. महिला उद्योजकांना विशेष सवलत असेल. युवकांनी नोकरीऐवजी स्वावलंबी होण्यावर भर द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
ईडीसीच्या फॅकल्टी मेंटर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत महाविद्यालये, शाळा आणि तांत्रिक शिक्षण संस्थांमधील २०० प्राध्यापकांना उद्योजकता मार्गदर्शक बनण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल.
पहिल्या वर्षी उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि शालेय शिक्षण यासह विविध शिक्षण संचालनालयांमधील २०० प्राध्यापकांची निवड केली जाईल. या प्राध्यापकांना सहा दिवसांचे शिक्षण दिले जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.