नवकल्पना साकारणारे युवक घडविण्याचा प्रयत्न: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:22 IST2026-02-25T13:20:22+5:302026-02-25T13:22:16+5:30
'कन्वर्ज ३' चे उद्घाटन

नवकल्पना साकारणारे युवक घडविण्याचा प्रयत्न: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: विद्यार्थ्यांना केवळ नोकरी शोधणारे नव्हे तर समस्या सोडविणारे, संशोधनाभिमुख आणि नवकल्पना साकार करणारे युवा म्हणून घडविण्याचा प्रयत्न होत असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. शैक्षणिक व उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण अशा 'कन्वर्ज ३.०-शिक्षण, उद्योजक संगम' परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
बांबोळी येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर झालेल्या या परिषदेचे आयोजन राज्य सरकार, उच्च शिक्षण परिषद आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते. 'तज्ज्ञांकडून हॅकाथॉन, बूटकॅम्प आणि मेंटॉरशिप सत्रे घेण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ नोकरी शोधणारे नव्हे तर समस्या सोडविणारे, संशोधनाभिमुख आणि नवकल्पना साकार करणारे युवा म्हणून घडविण्याचा प्रयत्न होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 'क्लासरूम ते करिअर" असा प्रभावी दुवा तयार करणे हा याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
५० महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा सहभाग
'इनोव्हेट, इंटिग्रेट, इम्पॅक्ट' या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम राज्यातील शिक्षण व्यवस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील दरी कमी करून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम व उद्योजक बनविण्यासाठी होता, आयोजकांनी सांगितले. या परिषेदेला चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील ५० महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभाग नोंदवला. याशिवाय अग्रगण्य उद्योग भागीदार, तज्ज्ञ, स्टार्टअप मार्गदर्शक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगाच्या गरजांशी जोडण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या प्रभावी उपक्रमासाठी उच्च शिक्षण संचालनालयाला मिळालेल्या स्कोच पुरस्काराबद्दल मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले. हा पुरस्कार राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक उपक्रमांची दखल घेतो, असे त्यांनी सांगितले.
हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांशी सुसंगत असून कौशल्याधारित शिक्षण, उद्योग सहकार्य, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकता यांना चालना देतो, असे नमूद करण्यात आले.