कमी किंमतीमुळे अर्थव्यवस्थेला गती: मंत्री विश्वजित राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 12:42 IST2025-09-28T12:41:44+5:302025-09-28T12:42:09+5:30
वाळपईत 'वस्तू व सेवा कर उत्सव' साजरा

कमी किंमतीमुळे अर्थव्यवस्थेला गती: मंत्री विश्वजित राणे
लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा देत जीएसटी कर संरचना सुलभ केली आहे. यापूर्वी ५, १२, १८ आणि २८ टक्क्यांच्या विविध श्रेणींमध्ये असलेला कर आता केवळ ५ आणि १८ टक्के एवढ्यावर आणला आहे. त्यामुळे विविध वस्तूंवरील उपभोक्ता किंमत कमी झाली असून, ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेला गती मिळणार असल्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.
आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शनिवार, २७ रोजी वाळपई येथे विशेष मोहीम राबवून स्थानिक व्यापाऱ्यांना जीएसटी (वस्तू व सेवा कर) कमी झाल्याचा थेट लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. त्यांनी व्यापाऱ्यांच्या दुकानांना भेट देऊन माहितीपत्रक वाटप केले तसेच ग्राहकांनाही मार्गदर्शन केले. यावेळी वाळपई नगराध्यक्षा प्रसन्ना गावस, उपनगराध्यक्ष रामदास शिरोडकर, नगरसेवक, भाजप समन्वयक विनोद शिंदे, पंच सदस्य तसेच युवावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ग्राहकांना थेट फायदा द्यावा
दुकानदारांनी या सुधारित कराचा फायदा थेट ग्राहकांना द्यावा. यामुळे ग्राहकांचे समाधान होईल, खरेदीत वाढ होईल आणि त्याचा परिणामस्वरूप व्यापाऱ्यांच्या व्यवसायालाही चालना मिळेल, असे आवाहन राणे यांनी यावेळी केले.
स्वदेशी मालाला प्रोत्साहन द्यावे
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय उत्पादनांवर इतर देशांकडून मोठ्या प्रमाणात कर लावला जातो. अशा परिस्थितीत देशी उत्पादनांचा प्रसार आणि प्रचार करण्याची वेळ आली आहे. स्थानिक स्तरावर स्वदेशी मालाला प्रोत्साहन दिल्यास देशी उद्योगांना चालना मिळेल, नवनवीन गुंतवणूक वाढेल आणि रोजगारनिर्मितीची संधी स्थानिक युवकांना मिळेल. आरोग्य मंत्री राणे यांच्या उपस्थितीत 'वस्तू व सेवा कर उत्सव' साजरा करण्यात आला.