‘मांडवी’तील बोटींची गर्दी हेदेखील दुर्घटनेस कारण, बंदर कप्तान खात्याला प्राप्त झाला अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 13:18 IST2017-10-29T13:18:08+5:302017-10-29T13:18:24+5:30
पणजी : मांडवी नदीत अंतर्गत जलवाहतुकीला अडसर येत आहे. कसिनो, जलसफरी करणा-या बोटी, कोळसा तसेच खनिज वाहतूक करणा-या बार्जेस, मच्छिमारी ट्रॉलर्स यामुळे नेहमीच मांडवीच्या पात्रात गर्दी असते, अशा वेळी फेरीबोट वाहतुकीतही व्यत्यय येतो.

‘मांडवी’तील बोटींची गर्दी हेदेखील दुर्घटनेस कारण, बंदर कप्तान खात्याला प्राप्त झाला अहवाल
पणजी : मांडवी नदीत अंतर्गत जलवाहतुकीला अडसर येत आहे. कसिनो, जलसफरी करणा-या बोटी, कोळसा तसेच खनिज वाहतूक करणा-या बार्जेस, मच्छिमारी ट्रॉलर्स यामुळे नेहमीच मांडवीच्या पात्रात गर्दी असते, अशा वेळी फेरीबोट वाहतुकीतही व्यत्यय येतो. गुरुवारी पणजी-बेती जलमार्गावरील फेरीबोट भरकटण्यामागे मांडवी पात्रातील बोटींची गर्दी हेदेखील एक कारण असल्याचे मानले जाते.
बंदर कप्तान खात्याला त्यासंबंधीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. मांडवीच्या पात्रात जागोजागी उभी केलेली कसिनो जहाजे, या कसिनोंवर ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणा-या फीडर बोटी, मुरगाव बंदरातून कोळसा तसेच बंदरापर्यंत खनिज वाहतूक करणा-या मोठ्या बार्जेस, पर्यटकांना जलविहारासाठी मांडवी पात्रातून दर्यासंगमापर्यंत घेऊन जाणा-या पर्यटक बोटी, मालीम जेटीवर असलेले 350 हून अधिक मच्छीमारी ट्रॉलर्स यामुळे मांडवी नदीच्या पात्रात गर्दी वाढलेली आहे.
मांडवी फिशरमेन्स को-आॅपरेटिव्ह सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा ट्रॉलरमालक सीताकांत परब यांनी सांगितले की, ट्रॉलर्स जेटीवरून बाहेर काढताना या बोटींच्या गर्दीमुळे मोठा त्रास होतो. कसिनोंवर ने आण करणा-या फीडर बोटींनी तर उच्छाद मांडला आहे. या फीडर बोटी रात्रंदिवस अविरतपणे चालू असतात. ट्रॉलर बाहेर काढणे त्यामुळे कठीण बनते. यातून एखाद्या मोठ्या दुर्घटनेचा धोका संभवतो. कोळसा वाहतूक करणा-या बार्जेसचीही ये जा चालू असते. सायंकाळी पाचनंतर येथील्सांता मोनिका जेटीवरून पर्यटकांना जल सफर घडविणा-या सुमारे 10 बोटी मिरामार दर्या संगमापर्यंत ये जा करीत असतात.
बंदर कप्तान जेम्स ब्रागांझा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही मांडवीच्या पात्रात बोटींची गर्दी वाढल्याचे मान्य केले. गुरुवारी पणजीहून बेतीला जाण्यासाठी प्रवाशांना घेऊन निघालेली फेरीबोट भरकटून फेरी धक्क्यापासून 60 मीटर अंतरावर कांपालच्या दिशेने नदीत रुतली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व 37 प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. गुरुवारी रात्री घडलेल्या दुर्घटनेने एक गोष्ट उघड झाली आहे ती अशी की, नदी परिवहन खात्याकडे अशी आणीबाणीची स्थिती हाताळण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. गेल्या पाच वर्षांत मांडवी नदीत फेरीबोट तसेच अन्य बोटी भरकटण्याच्या अशा सहा घटना घडल्या. खराब हवामान हे एक कारण आहेच, परंतु त्याचबरोबर मांडवी नदीच्या पात्रात असंख्य बोटींनी गर्दी केल्यामुळे वाहतुकीत असलेला अडसर देखील अन्य कारण आहे. बोटींची गर्दी चुकवत मार्ग गाना फुलाचे खांबाला धडक देण्याचे प्रकारही घडतात अशा दुर्घटना अनेकदा घडलेले आहेत.