जिंकू किंवा मरू....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 12:53 IST2026-03-22T12:51:02+5:302026-03-22T12:53:08+5:30

केतन भाटीकर यांना तिकीट देणे ही काँग्रेसची योग्य खेळी आहे. काँग्रेस जिंकणार की भाजपचे रितेश नाईक जिंकणार हे पुढील काही दिवसांत कळेलच.

do or die situation in ponda goa bypoll election 2026 | जिंकू किंवा मरू....

जिंकू किंवा मरू....

सारीपाट, सदगुरू पाटील संपादक, गोवा

केतन भाटीकर यांना तिकीट देणे ही काँग्रेसची योग्य खेळी आहे. काँग्रेस जिंकणार की भाजपचे रितेश नाईक जिंकणार हे पुढील काही दिवसांत कळेलच. मात्र फोंड्यात जबरदस्त टक्कर होणार आहे. एकाबाजूने भाजपची सर्व प्रकारची शक्ती व दुसऱ्याबाजूने काँग्रेस व केतन भाटीकर यांची शक्ती अशी लढत आहे. खरी लढत दुरंगीच आहे. मात्र खरे युद्ध हे २०२७ सालीच होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेसने जर विजयला सोबत घेतले नाही तर एकूणच विरोधकांचे नुकसान होईल. सर्वच विरोधकांसाठी जिंकू किंवा मरू अशीच स्थिती सध्याच्या टप्प्यावर आहे.

२०२७ ची विधानसभा निवडणूक जास्त दूर नाही. वास्तविक तांत्रिकदृष्ट्या ही निवडणूक २०२७ मध्ये असली तरी, प्रत्यक्षात पुढील अकरा महिन्यांत निवडणूक होणार आहे. विरोधकांसाठी निवडणूक म्हणजे जिंकू किंवा मरू अशी स्थिती असेल. कारण भाजपकडून सत्तासूत्रे आपल्या ताब्यात घेणे हे सोपे काम नाही.

विरोधकांसाठी हे काम आता जास्त अवघड आहे. कारण विरोधकांमध्ये एकी नाही आणि ती होणारही नाही. विरोधकांपैकी प्रत्येक नेत्याला वाटतेय की नेतृत्व आपल्या हाती यायला हवे. विरोधात आता सात आमदार असले, तरी त्यांच्यापैकी काहीजणांचे एकमेकांशी पटत नाही. युरी आलेमाव हे विरोधी पक्षनेतेपदी आहेत. मात्र त्यांना स्वतःला मर्यादा आहेत. युरींपेक्षा विधानसभेत विजय सरदेसाई हे जास्त प्रभावी ठरत आहेत, हे मान्य करावे लागेल.

युरी हे लिडर ऑफ अपोझिशन असल्याने त्यांना वाटतेय की विरोधकांकडे सत्ता आलीच तर काँग्रेसला आपल्याला सीएमपद द्यावे लागेल. विजय सरदेसाई हे गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते आहेत. युरींकडे नेतृत्व कायम ठेवले गेले तर विजयच्या पक्षाची काँग्रेससोबत युती होणार नाही असेच दिसते. विजयने स्वतःची वेगळी चूल मांडण्याची तयारी सुरू केली आहे. गुढी पाडव्यादिवशी बोलताना त्यांनी आपला पक्ष दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये काम करील असे सांगितले. 

दहा मतदारसंघांमध्ये गोवा फॉरवर्डची गट समिती स्थापन केली जाईल असेही जाहीर केले. एकंदरीत विजयकडून आता काँग्रेससमोर अडचणी निर्माण केल्या जात आहेत. अर्थात यात विजयलाही दोष देता येणार नाही. कारण आरजी पार्टीदेखील स्वतःचे काम विविध मतदारसंघांमध्ये करतेच. सुरुवातीपासून युरी आलेमाव यांनी प्रत्येक निर्णयाबाबत विजयलाही विश्वासात घ्यायला हवे होते. 

विरोधी आमदारांची रणनीती ठरवताना प्रत्येक विरोधी आमदाराला सोबत घेणे, विश्वासात घेणे हे कौशल्य असते. जो लिडर ऑफ अपोझिशन असतो, त्याच्याकडे ते कौशल्य असावेच लागते. विजय हे युरीपेक्षा सिनियर आहेत ही गोष्ट नजरेआड करता येत नाही. युरी एकदाच निवडून आलेत तर विजय तीनवेळा निवडून आलेले आमदार आहेत. त्यामुळे विजयला विश्वासात घेऊच विरोधकांनी रणनीती पक्की करायची असते हे युरींना कळायलाच हवे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची विजयशी मैत्री झालेली आहे. त्यामुळेही युरींनी अधिक सावधपणे विजयला विश्वासात घेऊन पुढे जाणेच गरजेचे होते.

सरदेसाई यांना जुडास किंवा विश्वासघातकी असे काहीजणांनी म्हणणे हेदेखील काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांच्यातील दरी वाढण्यास कारणीभूत ठरलेले आहे. अर्थात भाजपचे या सर्व हालचालींवर लक्ष आहेच. शेवटी सत्तेत असलेला भाजप हा सात आमदारांना कधीच संघटीत राहू देणार नाही, असेदेखील राजकीय जाणकार सांगतात. प्रत्येक राज्यात भाजपचे काही केंद्रीय नेते विरोधकांमध्ये फूट कायम ठेवत आलेले आहेत ही गोष्टही दुर्लक्ष करता येत नाही.

विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर असताना काँग्रेसला स्वतःची रणनीती पूर्णपणे बदलावी लागेल. काँग्रेसला आरामात सत्ता मिळणार नाही. भाजपला टक्कर देणे हे खूप अवघड काम आहे. कारण काँग्रेसकडे आजदेखील गोव्यात कार्यकर्ते संख्येने कमी आहेत. संघटनात्मक रचनाही नाही. 

अनेक मतदारसंघांमध्ये आता काँग्रेसचे पारंपरिक मतदार राहिलेले नाहीत. भाजपकडे कार्यकर्त्यांची फौज आहेच, शिवाय पक्ष कामावर खर्च करण्यासाठी प्रचंड निधीही आहे. काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्ष याबाबत कमी पडतात. पणजी महानगरपालिका निवडणुकीवेळीही तेच दिसून आले. उत्तर गोव्यात काँग्रेस खिळखिळा झालेला आहे. झेडपी निवडणुकीत फक्त दक्षिण गोव्यातच काँग्रेसचा प्रभाव थोडा दिसून आला. मुस्लिम व ख्रिस्ती मतदार हे काँग्रेसचे आजही बलस्थान आहे, पण ते मर्यादित प्रमाणातच काँग्रेसला तारू शकतील. अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून रद्द झालेली आहेत. 

शिवाय भाजपकडे आता ख्रिस्ती धर्मिय आमदार जास्त आहेत. युरी, एल्टन व कार्ल्स फरैरा या तीनपैकी कितीजण पुन्हा नव्या विधानसभेत पोहोचतील याचा प्राथमिक अंदाज आताच येतो. कॉंग्रेस पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणूक लढू शकणार नाही. त्या पक्षाला अन्य विरोधी पक्षांची गरज भासेलच. आम आदमी पक्षही स्वतंत्र लढणार आहे. तो पक्ष पुढील निवडणुकीवेळी काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्याच मतांमध्ये फूट पाडेल. आरजी पक्ष जर स्वतंत्र लढला तर त्याचाही धक्का काँग्रेसलाच काही ठिकाणी बसेल. 

गोवा फॉरवर्डनेही स्वतंत्र वाट धरली तर विरोधकांच्या मतांचे विभाजन होणार आहे. अर्थात काँग्रेसच्या तुलनेत अन्य सर्व पक्ष खूप छोटे असले तरी, गोव्यात प्रत्येक मतदारसंघात मतदारसंख्याच कमी असते. त्यामुळे प्रत्येकाने जर पाचशे ते हजार मते काढली तरी, कोणत्याही उमेदवाराचा जय-पराजय हा तेवढ्यावरूनच निश्चित होत असतो. म्हणूनच तर भाजपने मगो पक्षाला सोबत ठेवलेले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतीच सीएमपदी सात वर्षे पूर्ण केली. सावंत यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. मायकल लोबो, दिगंबर कामत, बाबूश मोन्सेरात, विश्वजीत राणे आदी नेते आज भाजपकडे आहेत. शिवाय सुदिन ढवळीकर, जीत आरोलकर आदी मगोपचे नेतेही भाजपचे साथीदार आहेत. आलेक्स रेजिनाल्डसारखे अपक्षही भाजपसोबत आहेत. अशावेळी काँग्रेस पक्ष जर स्वतःचेच हित पाहू लागला तर अन्य विरोधक काँग्रेसला साथ देणारच नाहीत. यात काँग्रेसचीच हानी होईल. फोंडा विधानसभा पोटनिवडणूक ही काँग्रेससाठी कसोटी आहे. केतन भाटीकर यांना तिकीट देणे ही काँग्रेसची योग्य खेळी आहे. केतनला आपण साथ देतोय असे राजेश वेरेकरही दाखवत आहेतच.

काँग्रेस जिंकणार की भाजपचे रितेश नाईक जिंकणार हे पुढील काही दिवसांत कळेलच. मात्र तिथे जबरदस्त टक्कर होणार आहे. एकाबाजूने भाजपची सर्व प्रकारची शक्ती व दुसऱ्याबाजूने काँग्रेस व केतन भाटीकर यांची शक्ती अशी लढत आहे. खरी लढत दुरंगीच आहे. मात्र खरे युद्ध हे २०२७ सालीच आहे. त्यापूर्वी काँग्रेसने जर विजयला सोबत घेतले नाही तर एकूणच विरोधकांचे नुकसान होईल. सर्वच विरोधकांसाठी जिंकू किंवा मरू अशीच स्थिती सध्याच्या टप्प्यावर आहे.

Web Title : गोवा राजनीति: 2027 चुनाव से पहले विपक्ष के लिए 'करो या मरो' की स्थिति

Web Summary : गोवा में विपक्ष एक महत्वपूर्ण मोड़ पर है। एकता की कमी है, और 2027 के चुनाव जल्द ही होने वाले हैं। कांग्रेस को एकजुट मोर्चे के लिए विजय के साथ सामंजस्य स्थापित करना चाहिए, या मजबूत भाजपा के खिलाफ हार का जोखिम उठाना चाहिए। फोंडा उपचुनाव एक परीक्षा है।

Web Title : Goa Politics: Opposition's 'Do or Die' Situation Before 2027 Elections

Web Summary : Goa's opposition faces a crucial juncture. Unity is lacking, and the 2027 elections are closer than they appear. Congress must reconcile with Vijay for a united front, or risk defeat against a strong BJP. Fonda by-election is a test.