जिल्हा पंचायत निवडणूक १३ डिसेंबर रोजीच होणार: मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 07:23 IST2025-11-05T07:22:29+5:302025-11-05T07:23:25+5:30
भाजप कोअर कमिटी बैठकीत मोदींच्या गोवाभेटीबाबत चर्चा

जिल्हा पंचायत निवडणूक १३ डिसेंबर रोजीच होणार: मुख्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायत निवडणूक ठरल्याप्रमाणे १३ डिसेंबर रोजीच होणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. काल भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत या निवडणुकीच्या तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २८ नोव्हेंबरच्या नियोजित गोवा भेटीबद्दल तयारीचा आढावा घेण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक तसेच कोअर कमिटीतील अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'येणाऱ्या काळात अनेक कार्यक्रमांचे आयोजन आहे. त्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली.
'वंदे मातरम'ला १५० वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त येत्या ७ रोजी तालुका स्तरावर सर्व सरकारी कार्यालये तसेच शाळांमध्ये सकाळी १० वाजता 'वंदे मातरम' गुंजणार आहे. तसेच पक्ष पातळीवरही कार्यक्रम होणार आहेत. शिवाय भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत तालुकावार विविध कार्यक्रमांचे आयोजन आहे.'
मुख्यमंत्री म्हणाले की, 'केंद्रीय निवडणूक आयोगाने गोव्यात मतदार याद्यांच्या विशेष पुनर्परीक्षणाचे काम हाती घेतले आहे. येत्या ४ डिसेंबरपर्यंत ते चालणार आहे त्या अनुषंगानेही बैठकीत चर्चा झाली.
पंतप्रधानांच्या गोवा - भेटीचाही घेतला आढावा
२८ नोव्हेंबर रोजी पर्तगाळ मठाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा भेटीवर येणार आहेत. पर्तगाळ मठाचा ५५० वा वर्धापनदिन असून यावेळी प्रभू श्रीरामचंद्राच्या देशातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण मोदींच्या हस्ते होणार आहे. यासंबंधी तयारीचा आढावाही बैठकीत घेण्यात आला.