ट्रकांचा वाद मिटला; धग कायम!
By Admin | Updated: January 8, 2016 01:47 IST2016-01-08T01:42:34+5:302016-01-08T01:47:39+5:30
फोंडा : ई-लिलाव झालेल्या खनिज मालाच्या वाहतुकीसाठी वाढीव दर मागणाऱ्या अखिल गोवा ट्रकमालक संघटनेचे गेले ३६ दिवस सुरू असलेले आंदोलन गुरुवारी तात्पुरते मागे घेण्यात आले.

ट्रकांचा वाद मिटला; धग कायम!
फोंडा : ई-लिलाव झालेल्या खनिज मालाच्या वाहतुकीसाठी वाढीव दर मागणाऱ्या अखिल गोवा ट्रकमालक संघटनेचे गेले ३६ दिवस सुरू असलेले आंदोलन गुरुवारी तात्पुरते मागे घेण्यात आले. सेसा कंपनीने संघटनेच्या सर्व मागण्या मान्य केल्यामुळे शुक्रवार दि. ८ जानेवारीपासून खनिज मालाची वाहतूक सुरू करण्याचा निर्णय संघटनेतर्फे घेण्यात आला. मात्र, आंदोलनाच्या काळात ट्रकमालक संघटनेच्या नाकावर टिच्चून कंपनीतर्फे खनिज वाहतूक करण्यासाठी गेलेले २३१ ट्रक कायमचे बंद करावे, तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कंपनीने दाखल केलेल्या पोलीस तक्रारी ५ फेब्रुवारीला मागे घ्याव्यात; अन्यथा संघटना वाहतूक बंद पाडून पुन्हा रस्त्यावर उतरेल, असा इशाराही देण्यात आला.
दुपारी अखिल गोवा ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ गावस यांनी सेसा कंपनीने ट्रकमालक संघटनेच्या सर्व मागण्या मान्य केल्यामुळे उद्या, दि. ८ जानेवारीपासून वाहतूक सुरू करत असल्याची घोषणा केली. या वेळी त्यांच्यासोबत बालाजी गावस, रमाकांत गावकर, शिवदास माडकर, जितेंद्र नाईक, भोला गावकर, शिवाजी नाईक, लक्ष्मीकांत नाईक व मोठ्या संख्येने ट्रकमालक उपस्थित होते. संघटनेतर्फे दारूकामाची आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. तत्पूर्वी नीळकंठ गावस यांनी एका मराठी वृत्तपत्रात छापून आलेल्या मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. ‘ट्रकमालक संघटनेची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही,’ असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या जिभेला लगाम घालावा. पार्सेकरांनी मनमानी वक्तव्य करू नये. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी जनतेला अपेक्षित काम करावे. ते जमत नसल्यास आपल्या पदाचा राजीनामा देऊन घरी बसावे, असा सल्लाही गावस यांनी दिला. सरकारने गोव्याला लुटण्याचा जो प्रयत्न चालविला आहे, त्याविरुद्ध संघटना नेहमीच आवाज उठवणार असून सरकारने ती दादागिरी समजावी किंवा आव्हान समजावे, असे ते म्हणाले. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी या व्यवसायातील तज्ज्ञ किंवा ट्रकमालकांशी चर्चा करून दर ठरविण्याची गरज होती. मात्र, तसे न करता अमुक दरात वाहतूक करा, अशी सूचना करून मुख्यमंत्र्यांनी या व्यवसायातले काहीच कळत नसल्याचे दाखवून दिल्याचा टोलाही गावस यांनी लगावला. (प्रतिनिधी)