भंडारींच्या प्रश्नावर दामू-रवींमध्ये चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:17 IST2025-04-11T13:15:58+5:302025-04-11T13:17:29+5:30
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी कृषिमंत्री रवी नाईक यांची फोंडा येथे भेट घेऊन तासभर चर्चा केली.

भंडारींच्या प्रश्नावर दामू-रवींमध्ये चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी कृषिमंत्री रवी नाईक यांची फोंडा येथे भेट घेऊन तासभर चर्चा केली. दोघांमध्ये राजकीय विषयांवर तसेच भंडारी समाजाकडून होत असलेल्या विविध मागण्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते. रवी हे भंडारी समाजाचे मोठे नेते मानले जातात. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हेही याच समाजाचे आहेत. अलीकडे गोवा भंडारी समाजाच्या नेत्यांनी जातनिहाय जनगणनेसाठी विरोधी पक्षांना निवेदने देणे सुरू केले आहे.
समाजाचे नेते असलेले भाजपचे माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, माजी आमदार किरण कांदोळकर यांनी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई तसेच नंतर मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदने दिलेली आहेत. भंडारी समाजाच्या अनेक मागण्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत ५० टक्के म्हणजेच २० जागा भंडारी समाजाला राखीव असायला हव्यात, अशी मागणी घेऊन गेल्या चतुर्थीच्या काळात भंडारी समाजाचे नेते रवी नाईक यांना भेटले होते व या मागणीचा पाठपुरावा विधानसभेत करावा, अशी मागणी त्यांनी रवींकडे केली होती. विधानसभेत एसटी समाजाला चार मतदारसंघ राखीव होऊन त्यांची मागणी जर पूर्ण होत असेल तर भंडारी समाजानेच मागे का राहावे, अशी आक्रमक भूमिका मध्यंतरी समाजाच्या नेत्यांनी घेतली होती. फोंडा मतदारसंघात भाजप मंडळ समिती स्थापन व्हायची आहे. तसेच भाजपचा कार्यकर्ता मेळावाही होणार असून त्याविषयीही दामू यांनी रवींशी चर्चा केली.
फोंडा तालुक्याचा घेतला आढावा
फोंडा तालुक्यातील चार मतदारसंघांमध्ये भाजपच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. प्रियोळ मतदारसंघ भाजपच लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी कार्यकर्ता मेळाव्यात केली होती व मगोपला ते मान्य नसेल तर चालते व्हावे, असा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर दामू यांनी फोंडा तालुक्यातील स्थितीचा आढावा रींकडे बोलून घेतला.