उद्योगांच्या गरजेनुसार थेट रोजगारसंधी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 08:04 IST2026-04-01T08:03:34+5:302026-04-01T08:04:00+5:30
गोवा राज्य योजना राबविण्यात अव्वल

उद्योगांच्या गरजेनुसार थेट रोजगारसंधी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोव्यातील ग्रामीण युवकांना कौशल्यातून थेट रोजगाराच्या दिशेने नेणाऱ्या 'डीडीयू-जीकेवाय २.०' योजनेला नवे बळ मिळाले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी दोनापावल येथील 'लोकभवन'मध्ये आयोजित 'प्लेसमेंट पार्टनर्स अँड एम्प्लॉइज' परिषदेचे उद्घाटन करत या उपक्रमाला गती दिली. उद्योगांच्या गरजेनुसार थेट रोजगाराच्या संधी दिल्या जात असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'ही योजना प्रभावीपणे राबवणारे भारतातील गोवा हे पहिले राज्य आहे. या माध्यमातून ग्रामीण युवकांना केवळ प्रशिक्षणच नव्हे, तर उद्योगांच्या गरजेनुसार थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. योजनेंतर्गत दिले जाणारे प्रशिक्षण हे प्रत्यक्ष उद्योगांच्या गरजांशी संलग्न करण्यात येत आहे. त्यामुळे युवकांना प्रशिक्षणानंतर त्वरित रोजगार मिळण्याची शक्यता वाढली आहे.'
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'राज्यात सध्या बारा प्रशिक्षण केंद्रांमधून १२०० हून अधिक युवक नोंदणीकृत असून, या उपक्रमाचा विस्तार सातत्याने होत आहे. विविध उद्योग आणि नियोक्त्यांसोबत सहकार्य करून कौशल्य आणि रोजगार यातील दरी कमी करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे प्रशिक्षणानंतर थेट नोकरी मिळवण्याचा मार्ग सुकर होत आहे.'
मुख्यमंत्री म्हणाले की, 'ही योजना गोव्यात भविष्याभिमुख आणि स्वावलंबी कार्यबल तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, ज्यातून 'स्वयंपूर्ण गोवा'ची संकल्पना साकारली जात आहे.' सावंत यांनी नमूद केले की, उद्योग भागीदारांच्या सहकार्याने 'युवा शक्ती'ला राज्याच्या विकासाचा मजबूत स्तंभ बनवले जात आहे. हा उपक्रम 'विकसित गोवा' आणि 'विकसित भारत' या व्यापक उद्दिष्टांकडे नेणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.'