दिगंबर आणि बाबूश यांचा दोस्ताना कायम; 'संपर्क से समर्थन' साठी पणजी फिरले एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 11:31 IST2023-06-09T11:30:17+5:302023-06-09T11:31:39+5:30
राजधानी शहरात घरोघर फिरून मतदारांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला.

दिगंबर आणि बाबूश यांचा दोस्ताना कायम; 'संपर्क से समर्थन' साठी पणजी फिरले एकत्र
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : भाजपच्या 'संपर्क से समर्थन अभियानाच्या निमित्ताने मंत्री बाबूश मोन्सेरात व आमदार दिगंबर कामत हे दोघेही जुने मित्र एकत्र आले आणि राजधानी शहरात घरोघर फिरून मतदारांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला.
काँग्रेसमध्ये असल्यापासून दोघेही जानी दोस्त. काल या दोघांना पणजीत घरोघर फिरताना पाहून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. कामत यांना काँग्रेसमधून भाजपात आणण्यासाठी बाबुश यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आता ते त्यांना मंत्रिपद मिळावे यासाठीही प्रयत्नरत आहेत.
कामत मंत्रिमंडळात बाबूश हे शिक्षणमंत्री होते. दोघांचेही बरेच जुळते. गेल्यावर्षी जुलैमध्ये काँग्रेस आमदार फुटण्याच्या प्रथम हालचाली झाल्या. दिगंबर कामत व मायकल लोबो हे फुटीसाठी आघाडीवर होते. परंतु दोन तृतीयांश म्हणजे आठ आमदारांचे संख्याबळ त्यावेळी झाले नाही व एक आमदार कमी पडल्याने फूट बारगळली. परंतु सप्टेंबरमध्ये कामत व लोबो यांच्यासह आठ आमदार शेवटी फुटलेच.