धनगर समाजाच्या मागणीत लक्ष घालेन: राष्ट्रपती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 09:14 IST2023-08-24T09:13:08+5:302023-08-24T09:14:44+5:30
राष्ट्रपतींनी आपण या विषयात लक्ष घालेन अशी ग्वाही दिली.

धनगर समाजाच्या मागणीत लक्ष घालेन: राष्ट्रपती
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोव्यातील धनगर समाजाचा समावेश एसटीमध्ये फार पूर्वीच म्हणजे २००३ सालीच व्हायला हवा होता, पण अजुनही तो झालेला नाही. असा मुद्दा माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर मांडला. त्यावेळी राष्ट्रपतींनी आपण या विषयात लक्ष घालेन अशी ग्वाही दिली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत व राज्यपाल पिल्लई यांच्या उपस्थितीत कवळेकर यांनी स्वतंत्रपणे काल राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यावेळी धनगर समाजातील आणखी नऊ बांधव उपस्थित होते. गावडा, कुणबी, वेळीप व धनगर या चारही समाजांनी मोठी चळवळ केली होती. त्यानंतर तीन समाजांचा समावेश एसटींमध्ये झाला पण आमच्या धनगर बांधवांचा मात्र एसटीत समावेश झाला नाही, असे कवळेकर यांनी राष्ट्रपतींना सांगितले.
या मागणीबाबत गोवा मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला नाही काय अशी विचारणा राष्ट्रपतींनी केली. त्यावर मंत्रिमंडळाने व गोवा विधानसभेनेही ठराव संमत केलेला आहे, निर्णय घेतलेला आहे असे कवळेकर यांनी दाखवून दिले.
धनगर समाजाला अनुसूचित जमातींचा दर्जा देण्यास अन्य तीन समाजांचाही विरोध नाही हाही मुद्दा कवळेकर यांनी राष्ट्रपतींसमोर मांडला. विविध अहवाल व श्वेतपत्रिकाही यापूर्वी आलेल्या आहेत. त्यांचाही संदर्भ कवळेकर यांनी दिला. २००३ सालापासून धनगर बांधव एसटी समावेशपासून वंचित आहे असे कवळेकर बोलले. मुख्यमंत्री सावंत यांनीही कवळेकर यांच्या मागणीला पाठिंबा दिला. मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते कवळेकर व इतरांनी मिळून राष्ट्रपतींना मागणीचे निवेदन सादर केले.