विकसित भारत, विकसित गोवा हाच संकल्प: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:20 IST2025-04-07T11:19:28+5:302025-04-07T11:20:21+5:30
भाजप स्थापनादिनी आमदार प्रेमेंद्र शेट, चंद्रकांत शेट्ये यांनीही फडकवला ध्वज, डिचोली तालुक्यात उत्साह

विकसित भारत, विकसित गोवा हाच संकल्प: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: भाजपच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या निवासस्थानी पक्षाचा ध्वज फडकवला. 'विकसित भारत, विकसित गोवा' या मोहिमेंतर्गत सेवा, समर्पण भावनेने राज्याचा गतिमान विकास सुरू आहे. भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून गरूडझेप घेत देशाची धुरा सक्षमपणे सांभाळत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
डिचोली तालुक्यात साखळी, डिचोली, मये मतदारसंघात कार्यकर्त्यांनी तसेच मुख्यमंत्री सावंत, आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आदींनी विविध ठिकाणी भाजपचा ध्वज फडकवला. कार्यकर्त्यांनीही घरोघरी ध्वज फडकवला. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ही पक्षाची ताकद आहे. त्यांच्या बळावरच आज देशभर भाजपची पताका दिमाखाने उभी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आज भारत जागतिक पातळीवर महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आगामी काही दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. घर चलो अभियान, सेवा उपक्रमासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी भाजप २०२७ मध्ये पूर्ण बहुमताने विजयी होणार असल्याचा दावा करताना आतापासूनच आम्ही कामाला लागल्याचे स्पष्ट केले.
आमदार शेट्येंचा सहभाग
आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आहे. त्या बरोबरीने आपण पक्षाच्या कार्यात सहभाग घेत असून, कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा आहे. भाजप खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा पक्ष ठरला आहे, असे सांगितले. भारतीय जनता पक्षाचे मंडळ अध्यक्ष डॉ. कौस्तुभपाटणेकर, नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, वल्लभ साळकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.