कोट्यवधी कमवूनही कॅसिनोंनी थकविले ३१४ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 11:26 IST2026-02-11T11:26:35+5:302026-02-11T11:26:58+5:30
सरकारकडे एकूण ३१४ कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित असून ही रक्कम अजूनही वसूल झालेली नाही.

कोट्यवधी कमवूनही कॅसिनोंनी थकविले ३१४ कोटी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील कोट्यवधींचा नफा मिळविणाऱ्या विविध कॅसिनोंकडून मोठी कर चुकवेगिरी केल्याचे आढळून आले आहे. सरकारकडे एकूण ३१४ कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित असून ही रक्कम अजूनही वसूल झालेली नाही.
२०१८ पासून ३१ मार्च २०२२ या कालावधीत बंद झालेल्या तीन कॅसिनोंकडूनच २६९ कोटी रुपयांची थकबाकी येणे बाकी आहे. ला कॅलिप्सो हॉटेल्सकडून १०७ कोटी ११ लाख रुपये, बोगमाळो बीच रिसॉर्टवरील ट्रेड विंगस कॅसिनोकडून ८२ कोटी ७० लाख रुपये, तर नोवोटेल गोवा श्रेम रिसॉर्टवरील एमकेएम ग्रँड गेमिंगकडून ८० कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.
मांडवीतील कॅसिनोंवर आक्षेप
कॅसिनोंकडून सरकारकडे नोंदणी शुल्क आणि वार्षिक शुल्काच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर महसूल जमा होणे अपेक्षित असते. मात्र ही रक्कम वेळेवर न भरता थकवण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे दिसून येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी असतानाही मांडवी नदीत आणखी मोठ्या कॅसिनो जहाजाला परवानगी देण्याच्या हालचाली सुरू असल्याने सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पाच कॅसिनोंकडे थकले पैसे
याशिवाय सध्या सुरू असलेल्या पाच कॅसिनोंकडूनही सरकारला मोठ्या रकमेची देणी मिळायची आहेत. ब्रिटो अँमुजमेंट हॉटेल वायंगिणी वॅलीकडून २ कोटी ५० लाख रुपये, रॅफल्स स्क्वेअर डेव्हलपमेंट द ओ हॉटेलकडून ७कोटी ५० लाख रुपये, बीग बी लेजर हॉटेल रियो रॉयलकडून १४ कोटी रुपये, मॅचोस एंटरटेन्मेंट अवेन्यू ग्रैंड हॉटेल कळंगूटकडून १८ कोटी रुपये आणि गोल्डन ग्लोब हॉटेल्सच्या एम व्ही लकी सेव्हन व्हेसलकडून २ कोटी ७५ लाख रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे.