पर्यटकांचे जीवघेणे स्टंट; अतिथी देवो भव ही गोव्याची संस्कृती पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2024 01:27 PM2024-05-02T13:27:38+5:302024-05-02T13:29:18+5:30

गोव्याला वार्षिक एक कोटीच्या आसपास पर्यटक भेट देतात.

deadly tourist stunts in goa | पर्यटकांचे जीवघेणे स्टंट; अतिथी देवो भव ही गोव्याची संस्कृती पण...

पर्यटकांचे जीवघेणे स्टंट; अतिथी देवो भव ही गोव्याची संस्कृती पण...

गोव्याला वार्षिक एक कोटीच्या आसपास पर्यटक भेट देतात. जगभरातून पर्यटक या प्रदेशात येतात. पूर्वी साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांच्या राजवटीखाली हा प्रदेश होता, येथील सांस्कृतिक वातावरणावर त्याचा थोडा परिणाम अजून पर्यटकांना जाणवतो, विशेषतः किनारी भागात हा पगडा आहे, असे युरोपियन पर्यटक मानतात. या प्रदेशातील देखणी, सुबक मंदिरे आणि पांढऱ्याशुभ्र चर्चेस पाहून लाखो पर्यटकांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. 

स्वच्छ सागर किनारे पर्यटकांना मोहवतात. यामुळेच पर्यटक येथे येतात पण अनेक पर्यटक आता स्टंट करून स्वतःचा जीव धोक्यात घालतात, शिवाय स्थानिक गोमंतकीयांच्याही जीवाला काहीवेळा धोका पोहचतो. अतिथी देवो भव ही गोव्याची संस्कृती आहे, पण जीवघेणे स्टंट करणान्या पर्यटकांविरुद्ध अलिकडे गोव्यात कारवाईचे प्रमाण वाढले आहे. सरकारचाही नाईलाज आहे. स्टंटबाजी करणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी पकडून तुरुंगात टाकल्याचीही उदाहरणे आहेत, बार्देश तालुक्यात जगप्रसिद्ध समुद्र‌किनारे आहेत. 

कळंगुट-कांदोळी-बागा-सिकेरी-वागातोर-हणजूण या किनारी भागाला समुद्राचे मोठे सौंदर्य लाभलेले आहे. पांढऱ्याशुभ्र लाटा काळ्याशार खडकांवर आदळतात. पर्यटक अशा किनाऱ्यांवर जाऊन धोकादायक खडकांवर उभे राहतात आणि सेल्फी काढण्याच्या नादात जीव देखील गमावतात. अलिकडे बार्देशात दोघा पर्यटकांना अटक झाली आहे. रस्ता सुरक्षेचे नियम न पाळता ते स्टंट करत होते. उघड्या जीपमध्ये अत्यंत धोकादायक पद्धतीने उभे राहणे, हातवारे करणे आणि समोरून येणाऱ्या वाहनांनाही अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने जीप चालविणे असे कृत्य करताना यापूर्वीही कळंगुटच्या भागात कारवाई झालेली आहे.

किनारी भागात तर रेन्ट अ कार सर्वत्र फिरताना दिसतात. काही पर्यटक दारूच्या नशेत ही वाहने चालवितात. खाओ, पिओ, मजा करो म्हणजे गोवा एवढाच समज मनात ठेवून आलेले पर्यटक अत्यंत बेपर्वा व बेफाम पद्धतीने गोव्यात वागतात. अलिकडे काही पर्यटक अपघाताला कारण ठरले आहेत. स्टंटबाजीतूनच अपघात होत आहेत. काही पर्यटक रात्री उशिरापर्यंत क्लबमध्ये पार्च्छा करतात व मग पहाटे पेंगुळलेल्या डोळ्यांनी वाहन चालवतात व अपघात करून स्वतःचा जीव गमावून बसतात. गोवा म्हणजे किलर स्टेट अशी प्रतिमा हेच बेजबाबदार पर्यटक रंगवत आहेत.

पणजीतील अटल सेतूवर दुचाक्या चालवू नये असा नियम आहे. दुचाक्यांना तिथे बंदीच आहे पण पर्यटक हमखास दुचाक्या घेऊन पुलावर जातात. समोरून भरधाव येणारी चारचाकी वाहने आणि सुसाट सुटलेले वारे याची पर्वा न करता दुधाक्या चालविल्या जातात. अशा प्रकारच्या पर्यटकांना पोलिस अडवून दंड ठोठावताना दिसून येतात. काही पर्यटक अटल सेतूवर स्टंट करण्यासाठी जातात व मग त्यांच्यावर देखील कारवाई होते. सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास गोव्यात बंदी आहे पण हमखास अनेक पर्यटक या बंदीचे उल्लंघन करतात. किनाऱ्यांवर रेतीत वाहन चालविण्यावर तर पूर्णपणे बंदी आहे. पण बहुतांश पर्यटक मुद्दाम स्टंट करण्यासाठी रेतीत आपले चार चाकी वाहन नेतात. 

एवढेच नव्हे तर काहीजण जिथे एक पाऊल बुडेल एवढेच समुद्राचे पाणी आहे, अशा पाण्यात देखील वाहन नेत आहेत. यापूर्वी काहीवेळा अशी वाहने किनाऱ्यावरच रुतल्याची उदाहरणे आहेत. पोलिसांनी कधी पेडणे तर कधी बार्देशच्या किनारी भागात अशा पर्यटकांना दंड ठोठवल्याची उदाहरणे आहेत. गोव्यात पाहण्यासारखे खूप काही आहे. मौजमजा करताना पर्यटकांनी जबाबदार बनावे, असे आवाहन सातत्याने पोलिस करत असतात, सरकारचे पर्यटन खातेही करते पण अलिकडे तरूण पर्यटक ऐकत नाहीत. केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, दिल्ली येथून लाखो पर्यटक उत्तर गोव्यात दर महिन्याला येऊन जातात. यापैकी काही पर्यटकांना स्टंटबाजी भोवते. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर मग गोव्याच्या नावाने ओरड केली जाते. काही पर्यटक अमली पदार्थाचेही सेवन करून स्टंटबाजी करतात व मग त्यांना गजाआड करण्याची पाळी पोलिसांवर येते.
 

Web Title: deadly tourist stunts in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.