दाऊदचा हस्तक 'दानिश'ला हणजूण येथे ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 08:45 IST2025-10-30T08:44:25+5:302025-10-30T08:45:40+5:30
मंगळवारी मध्यरात्री मध्यरात्री झालेल्या या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली.

दाऊदचा हस्तक 'दानिश'ला हणजूण येथे ठोकल्या बेड्या
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गुन्हेगारी जगतातील कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम जवळचा मानला जाणारा दानिश मर्चट ऊर्फ दानिश चिकना याला राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने हणजूण येथे अटक केली. मंगळवारी मध्यरात्री मध्यरात्री झालेल्या या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली.
दानिशचे दाऊद गँगशी जवळचे संबंध असल्याचे बोलले जाते. तो अमली पदार्थ व्यवहाराच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा घटक होता आणि त्याच्या हालचालींवर एनसीबीचे लक्ष होते. तो गोव्यात असल्याची माहिती मिळाल्यावर त्वरित छापा टाकून अटक करण्यात आली. अटकेवेळी तो हणजूण येथील एका हॉटेलमध्ये होता, अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली.
मुंबई एनसीबीने रात्री उशिरा ही कारवाई केली. दानिश चिकनाचे खरे नाव दानिश मर्चट आहे. दाऊदच्या नेटवर्क अंतर्गत मुंबईतील डोंगरी येथे ड्रग्ज फॅक्टरी चालवल्याबद्दल तो बऱ्याच काळापासून चौकशीत होता. अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, त्याने मुंबई आणि देशाच्या इतर भागात ड्रग्जचे व्यवस्थापन आणि वितरण करण्यात मोठी भूमिका बजावली होती. डोंगरी भागात ड्रग्ज सिंडिकेट चालवल्याच्या आरोपाखाली एनसीबीने चिकनाला यापूर्वी अटक केली होती. तथापि, अनेकदा अटक झाल्यानंतरही तो नवीन नेटवर्क वापरून बेकायदेशीर व्यापार करत राहिला.
अनेकवेळा अटक
२०१९ मध्ये, एनसीबीने डोंगरी येथील एका ड्रग्ज मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा पर्दाफाश केला. तो दाऊदच्या नेटवर्कचा भाग असल्याचे सांगितले जात होते. एका भाजीपाल्याच्या दुकानातून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. हे या भाजीपाला विक्री केंद्रातून चालविण्यात येत होते. त्यावेळी दानिशला राजस्थानमधून अटक करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर लगेचच त्याची सुटका झाली. २०२१ मध्ये, कोटा पोलिस, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने केलेल्या कारवाईत दानिशला राजस्थानच्या कोटा येथून अटक केली होती. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी त्याच्या वाहनातून ड्रग्ज जप्त केले होते.
डोंगरी परिसरात ड्रग्स निर्मितीचे मोठे नेटवर्क
एनसीबीने मुंबईतील एका ड्रग्ज प्रयोगशाळेवर छापा टाकला होता. जिथे मर्चट ड्रग्ज उत्पादन आणि पुरवठा नेटवर्कचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करत असल्याचा संशय होता. तो गोव्यात असल्याचे समजल्यानंतर त्याला अटक केली. अटकेवेळी, अधिकाऱ्यांनी त्याच्या ताब्यातून २०० ग्रॅम ड्रग्ज जप्त केले. त्यानंतर त्याच्यावर एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.