खडतर परिश्रमाने भाजपा प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोचलेले दामू नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:44 IST2025-09-06T12:44:06+5:302025-09-06T12:44:56+5:30

पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करताना आणि तरुण वयात धडपडताना दामू नाईक यांनी अनेक आव्हाने झेलली. प्रसंगी वृत्तपत्रे, अगरबत्ती, भाजी, फुलेही विकली.

damu naik who rose to the post of bjp state president through hard work | खडतर परिश्रमाने भाजपा प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोचलेले दामू नाईक

खडतर परिश्रमाने भाजपा प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोचलेले दामू नाईक

पूर्णानंद च्यारी, लेखक

पदवी, पदव्युत्तर आणि त्याच्याही पुढे जाण्यासाठी किती परीक्षा द्याव्या लागतात, प्रत्येकाचा अभ्यासक्रम वेगळा, पण त्यामधून आपली वाट शोधत खडतर प्रयत्नांची साखळी गुंफीत मार्गक्रमण करीत जाणं हे खऱ्या जिद्दी माणसाचं लक्षण.

आयुष्याच्या परीक्षेत अभ्यासक्रम हा ठरलेला नसतो. अनुभवांच्या गाठोड्यातून डोक्यात साठवलेल्या स्वप्नांना वास्तवाचे पंख देण्याच्या संघर्षात आणि धडपडीत सर्व काही सामावलेले असते. भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक यांचा ६ सप्टेंबर हा वाढदिवस. वाढे वाढे कर्तृत्व घडे, वाढे वाढे व्यक्तिमत्त्व घडे, वाढे वाढे लौकिक घडे, संघर्षातून कर्तबगारीचे चौघडे घुमवत येणारा दामू आज वय वर्षे ५४ चा होत आहे.

६ सप्टेंबर १९७१ रोजी मडगावी श्री देव दामबाबांच्या स्थळात जन्मलेले हे मूल गरिबीचे चटके आणि आयुष्याला परिस्थितीची ठिगळे लावत जगत वाढले. आई परिवारासाठी कुणाच्या घरी काम करायची, वडील लॉटरी विकायचे. लहान वयातच मिळेल ते काम करणं, इतर भावंडांचं पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण, खाण्या-पिण्याची मारामार, शिक्षणासाठी काय करावं, कसं करावं, त्यात दामू बुद्धिमान, हुशार, इतर भावंडांची हुशारी जेमतेम. चार भावंडांमध्ये हुशार, चपळ असे दामू एकच होते. शेंडेफळ. त्यांनीच पुढच्या आयुष्यात सर्व घर परिवार सावरला, इतरांची लग्न लावून दिली, परिवार उभा करून दिला. मिळेल ती कामे केली. हिमतीने शिकले. पदवीपर्यंतचे शिक्षण उत्कृष्टपणे पूर्ण केले.

हे शिक्षण पूर्ण करताना आणि तरुण वयात धडपडताना दामू नाईक यांनी अनेक आव्हाने झेलली. भाजी दुकानात भाजी निवडायची, कुजलेले बटाटे वेगळे काढायचे, पहाटे चार पाच वाजता उठून वृत्तपत्रे विकायची, घरोघरी टाकायची, मडगावच्या पिंपळ पेडाभोवती राहून फुलं विकायची, वासू अगरबत्तीचे पुडे विकायचे, हॉटेलात कप बशा, टेबलं पुसायची, बस कंडक्टर क्लीनर म्हणून पाळी, सुर्ला, वागूस लाइनला मथुरा बससाठी काम करायचे, लॉटरी विकायची, हातात डबे घेऊन आईस्क्रूटऽऽऽ म्हणत फिरायचे, कौलारू घरांची साफसफाई करायची, पै पैशांसाठी, स्वतःसाठी, घरातल्या मंडळींसाठी दिवस रात्र एक करत मिळेल ते काम करत आयुष्याच्या अभ्यासक्रमात आव्हानांना आव्हान देत पुढे पुढे गेले.

स्वातंत्र्यसेनानी मधुकर मोर्डेकर यांनी त्यांच्यामधला हुशार धडपड्या मुलगा हेरला. त्यांनीच दामूला शाळेच्या पायरीपर्यंतची वाट दाखवली. शाळेची घंटा ही दामूच्या शैक्षणिक प्रवासाची नांदी ठरली. श्री मोर्डेकर व्यावसायिक होते. त्यांनीच त्यांच्या हातात हिशोब, बिल व्यवहाराचे पेन कागद दिले. तेथूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा संपर्क झाला आणि तोच त्यांच्या आयुष्याला सामाजिक, राजकीय जीवनाला आकार देणारा ठरला.
युवा अवस्थेत येता येता भाड्याच्या खोलीत राहणारा दामू आपल्या कुटुंबासह स्वतंत्र छोट्याशा घरात राहायला आला. मडगावमधून फातोर्डा क्षेत्रात स्थलांतर केले. संघ शाखेच्या कामात असताना सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवत समाजकार्यात भाग घेणे हा ही धडपड्या वृत्तीचा भाग झाला.

संघाशी संबंधीत वडिलधाऱ्या माणसांनी फातोर्डा भागात काम सुरू करण्याचा सल्ला दिला. पाणी, वीज समस्या, रस्ता रुंदीकरण विषयावर दामूने सातत्याने आवाज उठवला. सामाजिक नेतृत्व म्हणून दामूचे व्यक्तिमत्त्व ठळकपणे दिसू लागले. मधल्या काळात मडगाव नगरपालिका निवडणुकीत प्रवेश करण्याचा मनोदय झाला. संघ संघटन मार्गदर्शकांच्या सल्ल्यानुसार माघार घेतली, पण कार्य, सातत्य आणि तीव्रता वाढत गेली. 

पक्षनिष्ठा, समाजकार्यात तत्परता हे कायम तत्त्व होत गेले. पक्षासाठी प्रामाणिकपणे विविध जबाबदाऱ्यांचे पालन करता करता फातोर्डा मतदारसंघाचे आमदार म्हणून दामू निवडून आले. राजकारण हे राजकारण असते. परिस्थिती अस्थिरतेच्या प्रवाहातून जाताना मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि प्रतिपक्षाला अनुकूल मतदारांचे बाहुल्य कायम राहिले. दामूंचे मतदार वेगळ्या मतदारसंघात पोचले. त्याचा परिणाम दामूंच्या मतदानावर झाला. पण आजपर्यंत निवडणुकांमध्ये मतांची संख्या आणि टक्केवारी वाढत गेलेली दिसत आहे.

आपल्या या राजकीय प्रवासात लोकसेवा प्रवाहात सक्रिय आणि यशस्वी होण्याचे श्रेय सुरुवातीच्या काळांत हेमंत बखले, अवधूत कामत यांच्यासह मनोहर पर्रीकर, राजेंद्र आर्लेकर, श्रीपाद नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर, गोविंद पर्वतकर, नरेंद्र सावईकर, सुभाष साळकर, सदानंद तानावडे, विनय तेंडुलकर आणि आज डॉ. प्रमोद सावंत (माननीय मुख्यमंत्री) यांना जाते. या सर्वांचे सहकार्य त्यांना लाभले. त्याबद्दल कृतज्ञतेची भावना ते व्यक्त करतात. साईबाबांवर श्रद्धा, दामबाबावर श्रद्धा ठेवून कामाला लागणारे दामू रोज आईबाबांच्या तसबिरीला हात जोडून दिनक्रम ठरवतात. सर्वांचे आशीर्वाद त्यांना लाभो.

दामू राजकारणी, दामू समाजसेवक, दामू कलाकार, अध्यात्म मानणारा, श्रद्धाळू, एक कुशल संघटक, तत्त्वनिष्ठ अशा बहुआयामी माणसांचा हितचिंतक परिवार आज त्यांच्यावर जन्मदिनी शुभकामनांचा वर्षाव करत आहे. शुभेच्छा, शुभेच्छा.

Web Title: damu naik who rose to the post of bjp state president through hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.