दाबोळी विस्तारीकरण महिनाभरात; दिल्लीतील घटनेनंतर परिसरातील सुरक्षेत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 07:51 IST2025-11-13T07:51:01+5:302025-11-13T07:51:30+5:30
नूतन संचालक आकाशदीप यांची माहिती

दाबोळी विस्तारीकरण महिनाभरात; दिल्लीतील घटनेनंतर परिसरातील सुरक्षेत वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: राज्यातील दाबोळी विमानतळ भौगोलिकदृष्ट्या एकदम चांगल्या स्थळी आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर येथे प्रवासी संख्येत आणखी जास्त वाढ होईल. सध्या दाबोळी विमानतळ ६५,६०० चौरस मीटर जागेत असून, विस्तारीकरण प्रकल्पामुळे आणखी १८,३०० चौरस मीटर जागेची वाढ होऊन एकूण क्षेत्र ८३,९०० चौरस मीटर होईल. विस्तारित इमारत प्रकल्पाचे काम एकंदरीत पूर्ण झाले असून, डिसेंबरात याचे उद्घाटन होण्याची शक्यता विमानतळाचे नूतन संचालक फ्लाइट लेफ्टनंट आकाशदीप यांनी व्यक्त केली.
आकाशदीप यांनी नुकताच विमानतळाच्या संचालकपदाचा ताबा घेतला आहे. त्यांना ३३ वर्षाचा विमान वाहतूक क्षेत्रात अनुभव असून, त्यांनी भारतीय हवाई दलात फ्लाइट लेफ्टनंट म्हणून सेवा बजावली आहे. १९९८ सालात भारतीय विमान प्राधिकरणात रुजू झाल्यानंतर त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळताना उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे. बुधवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी संचालक जॉर्ज वर्गीस उपस्थित होते. वर्गीस यांची बढतीने मुंबई विमानतळावर बदली झाल्याची माहिती देण्यात आली.
आकाशदीप यांनी दाबोळीवर ऑक्टोबर महिन्यात दररोज सुमारे १५ हजार १२७प्रवासी (ये-जा करणारे) हाताळल्याची माहिती दिली. दररोज ६० विमाने हाताळण्यात आल्याचे सांगितले. गेल्यावर्षी दाबोळीवर ७५ लाख प्रवासी हाताळले गेले. यंदा हा आकडा पार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'या' सुविधांमध्ये वाढ
आकाशदीप म्हणाले, की सध्या टर्मिनल इमारतीत एका वेळी ४,४५० प्रवाशी हाताळणी क्षमता आहे. ३२६० राष्ट्रीय व ११९० आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा समावेश आहे. इमारतीचा विस्तार होताच क्षमता ५१५० प्रवासी होईल. दाबोळीवर ६४ 'चेक इंन कांऊन्टर' असून, विस्तारीकरण पूर्ण झाल्यानंतर २६ 'चेक इन कांऊन्टर' उपलब्ध होतील. सध्या १० 'सेल्फ बॅगेज ड्रोप' सुविधा असून ती १४ होईल. 'बोर्डिंग ब्रीज' ८ वरून ९, 'एलिवेटर' १५ वरून २२, 'एस्कलेटर' १२ वरून १७, 'इन लाइन बॅगेज हैंडलिंग सिस्टम' सुविधा २ वरून ३ अशी वाढ होईल. पार्किंग सुविधेतही वाढ होईल.
विमानतळावर रेड अर्लट
दिल्लीतील स्फोटानंतर सुरक्षेच्या दृष्टीने दाबोळी विमानतळावर 'रेड अर्लट' जाहीर केला आहे. त्या घटनेनंतर सुरक्षेविषयी केंद्रीय सुरक्षा औद्योगिक दल, गोवा पोलिस, वाहतूक पोलिस आदी अधिकाऱ्यांसोबत बैठक चर्चा केली. वाहनांची कसून तपासणी केली जात असल्याची माहिती आकाशदीप यांनी दिली. दाबोळीतून देशातील १७ ठिकाणी प्रवासी विमानसेवा सुरू आहे. त्यात भुवनेश्वर आणि हिंडन (गाझियाबाद) या दोन ठिकाणींची भर पडली आहे. त्यामुळे देशातील १९ ठिकाणांसाठी येथून विमानसेवा सुरू झाली आहे. दुबई आणि बहरैन या विदेशी स्थळावर विमानसेवा उपलब्ध आहे. हल्लीच अल्माटी (कझाकस्तान) विमानसेवा सुरू झाली. भविष्यात येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानसेवेत वाढ होईल, अशी माहिती त्यांनी दिली.