अशाच प्रकारे हळूहळू दाबोळी विमानतळ संपविला जाईल; कॉग्रेस नेता एल्वीस गोंम्सचा आरोप

By पंकज शेट्ये | Published: February 27, 2024 08:21 PM2024-02-27T20:21:50+5:302024-02-27T20:23:17+5:30

दाबोळी संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचे आवाहन कॉग्रेस नेता एल्वीस गोंम्स यांनी केले.

dabolim airport will be phased out allegation of congress leader elvis gomes | अशाच प्रकारे हळूहळू दाबोळी विमानतळ संपविला जाईल; कॉग्रेस नेता एल्वीस गोंम्सचा आरोप

अशाच प्रकारे हळूहळू दाबोळी विमानतळ संपविला जाईल; कॉग्रेस नेता एल्वीस गोंम्सचा आरोप

पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: मोपा विमानतळावरील विमान वाहतूक वाढवण्यासाठी केंद्र सरकार दबाव आणून दाबोळी विमानतळावरील विमानसेवा तेथे नेणार असल्याचा ८ महीन्यापूर्वी आम्ही केलेला दावा हळू हळू करून खरा ठरत आहे. काही महीन्यापूर्वी एअर इंडियाने गॅटविक जाणारी विमानसेवा आणि ओमान एअर विमान कंपनीने त्यांची विमानसेवा दाबोळी विमानतळावरून मोपा विमानतळावर नेली. आता कतार एअरवेझ विमान कंपनीने त्यांची विमानसेवा दाबोळीवरून मोपावर नेण्याचे ठरवले असून अशा प्रकारे हळू हळू करून भविष्यात दाबोळी विमानतळ पूर्णपणे संपणार आहे. केंद्र सरकारच्या दबावामुळेच दाबोळीवरील विमानसेवा मोपावर जात असून त्यामुळे दक्षिण गोव्यातील हॉटेल, टॅक्सी इत्यादी पर्यटक व्यवसायांनी आर्थिक नुकसानी व्हायला लागलेली आहे. दक्षिण गोव्यातील लोकांना झालेल्या नुकसानीचा बदला लोकसभा निवडणूकीवेळी दक्षिण गोव्यातील मतदारांनी घेऊन दाबोळी संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचे आवाहन कॉग्रेस नेता एल्वीस गोंम्स यांनी केले.

मंगळवारी (दि.२७) कॉग्रेस नेता एल्वीस गोंम्स यांनी दाबोळी विमानतळावर येऊन कतार एअरवेझ कंपनीने त्यांची येथील विमानसेवा मोपावर हलवण्याचा निर्णय घेतल्याची माहीती दिली. यावेळी त्यांच्याबरोबर अन्य कॉग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. आठ महीन्यापूर्वी आम्ही केंद्र सरकार दबाव आणून दाबोळीवरील विमानसेवा मोपाला नेण्याचा प्रयत्न करत असल्याची माहीती दिली होती. दाबोळीवरील विमानसेवा मोपाला नेऊन दाबोळी संपवण्याचा प्रयत्न चालला असल्याचे आम्ही त्यावेळी सांगितले होते. त्यानंतर येथील एका सरकार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने आम्ही दाबोळी विमानतळाच्या विषयावरून विनाकारण भिती निर्माण करत असल्याचा आरोप केला होता. दाबोळी विमानतळावरील साधनसुविधेत वाढ करण्यात येत असून दाबोळी बंद होणार नसल्याचा दावा त्यांनी केला होता असे गोम्स यांनी सांगितले.

आम्ही दावा केल्याच्या काही दिवसानंतर प्रथम एअर इंडिया विमानाने त्यांची दाबोळी विमानतळावरून गॅटविकला जाणारी विमानसेवा मोपा विमानतळावर नेली. त्यानंतर ओमान एअरने त्यांची विमानसेवा दाबोळीवरून हलवून मोपावर नेली. आता कतार एअरवेझने त्यांची विमानसेवा दाबोळीवरून मोपाला नेण्याचे निश्चित केल्याची माहीती गोंम्स यांनी दिली. मोपा विमानतळ खासगी व्यवस्थापन चालवत असून त्याच्या हीतासाठी केंद्र सरकार दबाव आणून दाबोळीवरील विमानसेवा तेथे नेत असल्याचा आरोप गोंम्स यांनी केला. मागील काळात दाबोळीवरील विमानसेवा मोपाला नेल्याने दक्षिण गोव्यातील हॉटेल, टॅक्सी इत्यादी पर्यटक व्यवसायांना आर्थिक नुकसानी झालेली असून ती नुकसानी कायमस्वरुपी सोसावी लागणार आहे असे ते म्हणाले.

भविष्यात अशाच प्रकारे हळू हळू करून इतर विमानसेवा दाबोळीवरून हलवून मोपाला नेण्यात येणार असून अशा प्रकारे दाबोळी विमानतळ संपवण्यात येणार असल्याचा आरोप गोंम्स यांनी केला. दाबोळीवरील प्रवासी विमानसेवा पूर्णपणे बंद पाडून हा विमानतळ फक्त मालवाहू (कार्गो) विमानतळ करण्याचा हेतू सरकारचा असल्याचा दावा गोंम्स यांनी करून यामुळे दक्षिण गोव्यातील पर्यटक व्यवसाय ढासाळणार असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारने दाबोळी विमानतळ बंद पाडण्याचे जे षडयंत्र आखले आहे त्यासाठी त्यांना येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत दक्षिण गोव्यातील लोकांनी धडा शिकवण्याची गरज असल्याचे गोंम्स म्हणाले.

Web Title: dabolim airport will be phased out allegation of congress leader elvis gomes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.