सध्या राज्यात हुकूमशाहीचाच अनुभव: युरी आलेमाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:39 IST2025-07-08T12:39:17+5:302025-07-08T12:39:59+5:30
कुडचडे संविधान बचाव अभियान

सध्या राज्यात हुकूमशाहीचाच अनुभव: युरी आलेमाव
लोकमत न्यूज नेटवर्क, कुडचडे: सरकारला सामान्य शेतकऱ्यांच्या हिताशी काहीच देणे-घेणे नाही, म्हणूनच संजीवनी साखर कारखाना बंद करण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मांडलेले विविध विषय आपण विधानसभेत मांडणार असून सरकारला उत्तर द्यावेच लागणार. सरकार कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढते, वर्कऑर्डर निघतात पण विकास कामे पूर्ण होत नाही. राज्यात सुरू असलेली हुकुमशाही पोर्तुगीज, सालाझार यापेक्षाही भयानक आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.
कुडचडे, सावर्डे व सांगे मतदारसंघातील लोकांना आपल्या समस्या मांडता याव्यात यासाठी काँग्रेसने सोमवारी (दि.७) कुडचडे येथे संविधान बचाव अभियान आयोजित केले आहे. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, खासदार विरियातो फर्नांडिस, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता, सविओ डिसिल्वा, प्रदेश महिलाध्यक्षा प्रतीक्षा खलप, युवा अध्यक्ष महेश नाडर, रजनीकांत नाईक, जितेंद्र नाईक आदी उपस्थित होते. यावेळी युरी म्हणाले, की राज्यात बेरोजगारी वाढत चाललेली आहे. युवक व्यसनाकडे वळत आहे, पण सरकारचे लक्ष फक्त भ्रष्टाचार करण्याकडे आहे.
खासदार फर्नाडिस म्हणाले, की पुरेसे पाणी भाजप सरकार देऊ शकत नाही. खाण व्यवसाय सुरू करणार, हे खोटे आश्वासन दिली जात आहे. मात्र, कोळशासाठी काम सुरू आहे. आमदार डिकॉस्ता म्हणाले, की काँग्रेस पक्ष देशासाठी त्याग करणारा पक्ष आहे. आज जी काही विकासकामे दिसत आहेत, ती काँग्रेस पक्षाच्या साठ वर्षांच्या कालावधीत झाली.
'सागरमाला' होऊ देणार नाही: पाटकर
यावेळी पाटकर म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सादर केलेले प्रश्न आणि समस्या हे सरकार सोडवू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे. येणाऱ्या विधानसभेत काँग्रेस पक्ष अनेक विषयांवर आवाज उठविणार आहे. नद्याचे प्रदूषण होत आहे, त्यात सागरमाला प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही.