मंदिरांमधून सामाजिक परिवर्तन घडवा: CM सावंत; शिरोडा येथील शिवनाथ देवस्थान सभागृहाचे लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 09:04 IST2025-08-25T09:03:57+5:302025-08-25T09:04:25+5:30
शिरोडा येथील शिवनाथ देवस्थानच्या ग्रामपुरुष नूतन वातानुकूलित सभागृहाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला.

मंदिरांमधून सामाजिक परिवर्तन घडवा: CM सावंत; शिरोडा येथील शिवनाथ देवस्थान सभागृहाचे लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राज्यातील मंदिराबाबतीत आमचे सरकार संवेदनशील आहे. गेल्या काही वर्षात मंदिराच्या विकासासाठी व सौंदर्गीकरणासाठी आम्ही योजना राबवल्या आहेत. राज्यातील मंदिरे सांस्कृतिक केंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. एक पाऊल पुढे जाताना या मंदिराच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडून येईल यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
शिरोडा येथील शिवनाथ देवस्थानच्या ग्रामपुरुष नूतन वातानुकूलित सभागृहाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्याबरोबर जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, सरपंच मुग्धा शिरोडकर, डॉ. शिरीष बोरकर, जिर्णोद्धार समितीचे अध्यक्ष जयंत मिरींगकर, कोमुनिदादचे अध्यक्ष संदेश प्रभुदेसाई व देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, की गोव्यातील प्रत्येक व्यक्तीचा 'हॅपिनेस इंडेक्स' कसा वाढेल, याकडे सरकार लक्ष देत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून तळागाळातील व्यक्ती कसा समाधानी होईल, हे आम्ही बघत आहोत.
मुख्यमंत्री म्हणाले, की कोमुनिदाद व इतर सरकारी जमिनीवरील घरे कायदेशीर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. अजूनही काही घरे देवस्थानच्या जमिनीत आहेत. त्या घरांनाही अभय देऊया. या कामी देवस्थान समितीने उदार मनाने सरकारला साहाय्य केल्यास त्या लोकांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलवण्याची सरकारची आहे.
मंत्री शिरोडकर म्हणाले, की मंदिराच्या माध्यमातून गोव्यात अनेक चांगली सभागृहे उभी राहत आहेत. ती सभागृहे रिकामी ठेवू नका. पूर्ण क्षमतेने त्यांचा वापर झाला तरच सभागृह बांधण्यासाठी जो खर्च केला, त्याचे सार्थक होईल.
सुरुवातीला जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष जयंत मिरींगकर यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. सभागृह उभारणीत योगदान दिलेले अभय प्रभू, नीलेश प्रभू बोरकर, महादेव हेदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान झाला.
'विकासाची नवी परिभाषा'
मुख्यमंत्री म्हणाले की रस्ते, वीज व पाणी मिळाले म्हणजेच विकास झाला असे होत नाही. आमच्या सरकारने विकासाची नवी परिभाषा निर्माण केली आहे. म्हणूनच आम्ही मंदिराच्या माध्यमातून पर्यटनाला वेगळी चालना दिली आहे. गावाचा विकास करताना मंदिरांना आम्ही केंद्रबिंदू मानत आहोत. मंदिरे ही केवळ पर्यटकांसाठीच नसून स्थानिक लोकांनीही मंदिराच्या प्रांगणात वेळ घालवावा, अशा सुविधा निर्माण करत आहोत.
गोवेकरांना चिंतामुक्त करण्यासाठी 'माझे घर'
मुख्यमंत्री म्हणाले, की प्रत्येक गोमंतकीय चिंतामुक्त व्हावा म्हणून आमच्या योजना काम करतात. त्यातूनच माझे घर ही योजना उदयास आली. स्वतःच्या घराच्या चार भिंतीसाठी अनेक पिढ्या तणावयुक्त वातावरणात जगल्या. निदान या पुढील पिढीला कायदेशीर कागदपत्रासह हक्काचे घर मिळावे म्हणून आम्ही ही योजना आणली. त्याचा तळागाळातील लोकांना लाभ होईल.
मंदिरांच्या माध्यमातून घडले दिग्गज कलाकार : शिरोडकर
मंत्री शिरोडकर म्हणाले, की जगविख्यात कलाकार हे मंदिर परिसरातूनच तयार झालेले आहेत. याच मंदिराच्या माध्यमातून पुन्हा एकदा लता मंगेशकर, आशा भोसले, मेनका शिरोडकर यासारख्या जगविख्यात शास्त्रीय गायिका निर्माण करण्याचा प्रयत्न करूया. सरकार आपल्यापरिने प्रयत्न करेलच मात्र यासाठी समाजातील प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. मंदिराच्या माध्यमातून एक नवी कलाकार पिढी घडवूया.