'डबल इंजिन'मुळे देशाची प्रगती: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; साखळी भाजप मंडळ अध्यक्ष रामा नाईक यांचे अभिनंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2025 08:55 IST2025-01-07T08:55:15+5:302025-01-07T08:55:57+5:30
साखळी मतदारसंघ भारतीय जनता पक्ष मंडळ समितीच्या अध्यक्षपदी युवा नेते रामा नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

'डबल इंजिन'मुळे देशाची प्रगती: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; साखळी भाजप मंडळ अध्यक्ष रामा नाईक यांचे अभिनंदन
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : कार्यकर्ता ही भारतीय जनता पक्षाची खरी ताकद आहे. देश प्रथम ही भावना घेऊन भाजप आजपर्यंत कार्यरत राहिलेला आहे. पंतप्रधान मोदींनी देशाला वैभवाच्या शिखरावर नेताना जागतिक पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. प्रत्येक घरात समृद्धी आणण्याचा संकल्प सिद्धीस देण्याचा नारा यशस्वी केला आहे. मजबूत संघटनेद्वारे भाजप सर्व निवडणुकांमध्ये मोठी झेप घेत आहे. कार्यकर्त्यांनी यापुढे अशाच प्रकारे पक्षासाठी, देशासाठी योगदान देताना उत्तुंग भरारी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.
साखळी मतदारसंघ भारतीय जनता पक्ष मंडळ समितीच्या अध्यक्षपदी युवा नेते रामा नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. निवडणूक अधिकारी डॉ. कौस्तुभ पाटणेकर, सुलक्षणा सावंत, कालिदास गावस, मावळते अध्यक्ष गोपाळ सुर्लीकर, नवनिर्वाचित अध्यक्ष रामा नाईक, भाजपचे प्रमुख कार्यकर्ते, बूथ अध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपचे डबल इंजिन सरकार खऱ्या अर्थाने मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी कार्यरत झालेले आहे. आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न साकारण्यासाठी युवक पुढे सरसावलेले आहेत. त्यामुळे देशाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या राजवटीत देशात व राज्यातही डबल इंजिन होते. मात्र, त्यांना सत्तेची किंमत कधीच समजली नाही. पक्ष, देश मजबूत करणे, यासाठीच भाजप प्राधान्य देत असून विकास हा अजेंडा पुढे करताना केंद्र व राज्याची योजना प्रत्येक घरात पोहोचवणे, यासाठी कार्यकर्त्यांनी कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले. मागील निवडणुकीमध्ये भाजपला साखळीत ६०० मतांचा फरक होता. आगामी निवडणुकीसाठी आतापासूनच सज्ज राहून सात हजारांहून अधिक मतांचे मताधिक्य मिळविण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
नवनिर्वाचित अध्यक्ष रामा नाईक यांनी मुख्यमंत्री व कार्यकर्त्यांचे आभार मानले. सर्वांना बरोबर घेऊन पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रामाणिक कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.