गोवा वाचवण्यासाठी सहकार्य करा: कॅप्टन विरियातो फर्नाडिस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 10:33 IST2025-11-01T10:32:37+5:302025-11-01T10:33:07+5:30
वास्कोतील सुपूत्र तथा स्वींडनचे माजी महापौर इमत्याज शेख व त्यांच्या पत्नीचा वास्को येथे सत्कार

गोवा वाचवण्यासाठी सहकार्य करा: कॅप्टन विरियातो फर्नाडिस
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: आमच्या पूर्वजांनी राखून ठेवलेल्या गोव्याच्या पर्यावरणावर हल्ले होत आहेत. गोवा राखून ठेवण्यासाठी आम्ही सर्व प्रकारची पावले उचलत आहोत. गोवा राज्य आणि येथील पर्यावरण राखून ठेवण्यासाठी विदेशात असलेल्या गोमंतकीयांनी आम्हाला मदत करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरियातो फर्नाडिस यांनी केले.
स्वींडन (इंग्लंड) येथील माजी महापौर, विद्यमान नगरसेवक आणि वास्कोतील सुपुत्र इमत्याज शेख व त्यांच्या पत्नी तथा स्वींडन येथील, शिक्षण आणि कौशल्य कॅबिनेट सदस्य, आणि नगरसेवक एडोराबेल अमराल शेख काही दिवसांसाठी गोव्यात आले होते. गुरुवारी त्यांचा वास्कोत सत्कार करण्यात आला. यावेळी कॅ. विरियातो फर्नाडिस प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर वास्कोचे माजी आमदार जुझे फिलिप डिसोझा, प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक समितीचे माजी अध्यक्ष नझीर खान, किस्तोदीयो डिसोझा आदी उपस्थित होते.
गोव्यात असो किंवा विदेशात सर्व गोमंतकीयांनी एकत्रित राहून सर्वाच्या हितासाठी काम करणे गरजेचे आहे. आयुष्य एकदम साधे असून जर मी स्वीडनचा महापौर बनू शकलो तर कोणीही परिश्रम, मेहनत घेतल्यास तो त्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो, असे शेख म्हणाले.
जेव्हा आम्ही दुसऱ्या देशात, गावात राहतो, त्यावेळी आम्ही तेथील बांधवांवर पूर्ण विश्वास ठेवून सर्वांबरोबर एकत्रित राहून काम करणे गरजेचे आहे. मी काहीवेळा दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरियातो यांना गोव्यात सहकार्यासाठी संपर्क केला असता त्यांचे मला सहकार्य लाभले असून गोव्याच्या हितासाठी ते सदैव उचित पावले उचलत असल्याचे इमत्याज म्हणाले.
जुझे फिलीप डिसोझा यांचे इमत्याज यांनी कौतुक केले. इमत्याज यांच्या पत्नी एडोराबेल, जुझे फिलिप डिसोझा आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदैव गोव्याशी जोडलेलो
स्वींडन येथील माजी महापौर इमत्याज शेख यांनी सत्कार केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. आम्ही जरी विदेशात असलो तरी आमचे मूळ गोवा असून आम्ही गोव्याशी जोडलेलो आहोत. आम्हाला कोणीही गोव्यापासून दूर नेऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
गोमंतकीयांसाठी अभिनंदनाची बाब
गोव्यातील सुपुत्र इम्त्याज शेख आणि त्यांची पत्नी एडोराबेल शेख हे दोघेही विदेशात मोठ्या पदावर असल्याने गोमंतकीयांना मोठी अभिमानाची गोष्ट आहे. भविष्यातही गोमंतकीय विदेशात गोव्याचे नाव अभिमानाने उंचवण्याचे कार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोव्यातून स्वीडन येथे जाणाऱ्यांना या कुटुंबीयांनी रोजगार देण्यासाठी सुद्धा सहकार्य करावे, अशी विनंती फर्नांडिस यांनी केली.