२०२७ पूर्वी उभारणी, फोंड्यात 'ट्रान्स्पोर्ट हब' साकारणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 10:06 IST2026-04-04T10:05:22+5:302026-04-04T10:06:08+5:30

चालक-व्यावसायिकांच्या समस्या सुटणार; रेस्ट रूम, कॅन्टीन, वैद्यकीय सुविधांवर भर

construction to be done before 2027 transport hub to be built in ponda goa said cm pramod sawant | २०२७ पूर्वी उभारणी, फोंड्यात 'ट्रान्स्पोर्ट हब' साकारणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

२०२७ पूर्वी उभारणी, फोंड्यात 'ट्रान्स्पोर्ट हब' साकारणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : गोव्यातील मालवाहतूक क्षेत्राला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फोंड्यात अत्याधुनिक ट्रान्सपोर्ट हब उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. किमान दोन लाख चौरस मीटर क्षेत्रावर उभारल्या जाणाऱ्या या हबमुळे ट्रक चालक, वाहतूक व्यावसायिकांच्या समस्या कमी होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. २०२७ पूर्वी हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे.

फोंडा येथे आयोजित विशेष बैठकीत वाहतूक व्यावसायिकांशी मुख्यमंत्री बोलत होते. राज्यात येणाऱ्या चालकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. रेस्ट रूम, स्वच्छतागृहे, कॅन्टीनसह वैद्यकीय सेवांची कमतरता ही गंभीर समस्या असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

'वन-स्टॉप' सुविधा केंद्राची संकल्पना

फोंड्यात उभारण्यात येणारा ट्रान्सपोर्ट हब हा केवळ पार्किंग किंवा थांबा केंद्र नसून, तो 'वन-स्टॉप सोल्यूशन' म्हणून विकसित केला जाणार आहे. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासानंतर चालकांना विश्रांती, स्वच्छता, भोजन आणि आरोग्य तपासणी यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करावी लागू नये, हा मुख्य उद्देश आहे. एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून देत कामकाज अधिक सुकर करण्यावर भर दिला जाणार आहे.

देशातील पायाभूत सुविधांचा उल्लेख करताना त्यांनी २०१४ नंतर रस्ते जाळ्यात मोठी सुधारणा झाल्याचे सांगितले. उत्तम रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण घटले असून वाहतूक व्यवसायालाही गती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी बैठकीस रितेश नाईक, माजी खासदार नरेंद्र सावईकर, नगरसेवक व्यंकटेश नाईक, अनिता कवळेकर, विनय सिंग, सुशील शर्मा, हेमंत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या प्रकल्पामुळे केवळ चालकांच्या समस्या कमी होणार नाहीत, तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे. ट्रान्सपोर्ट हबमुळे रोजगारनिर्मिती, फोंड्याचे लॉजिस्टिक केंद्र म्हणून महत्त्व वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, राज्यातील मालवाहतूक व्यवस्थेची कार्यक्षमता अधिक बळकट होणार आहे.

२४ तास प्रवास करणाऱ्या ट्रक चालकांना सर्व आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हे सरकारचे ध्येय आहे. प्रस्तावित ट्रान्सपोर्ट हबमध्ये आधुनिक सोयी-सुविधांसह सर्वसमावेशक व्यवस्था उभारण्यात येणार आहेत. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Web Title : पोंडा में 2027 तक 'ट्रांसपोर्ट हब': मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Web Summary : गोवा सरकार 2027 तक पोंडा में आधुनिक ट्रांसपोर्ट हब बनाएगी। मुख्यमंत्री सावंत का लक्ष्य ट्रक चालकों की जरूरतों को 'वन-स्टॉप' सुविधा से पूरा करना है, जिसमें आराम, स्वच्छता, भोजन और स्वास्थ्य सेवा शामिल हैं। हब से आर्थिक लाभ और बेहतर लॉजिस्टिक्स का वादा।

Web Title : Ponda to get 'Transport Hub' by 2027: CM Pramod Sawant

Web Summary : Goa plans a modern transport hub in Ponda by 2027. Chief Minister Sawant aims to address truckers' needs with a 'one-stop' facility offering rest, hygiene, food, and healthcare. The hub promises economic benefits and enhanced logistics.