काँग्रेसने घेतला ‘यू-टर्न’
By Admin | Updated: January 8, 2016 01:46 IST2016-01-08T01:44:23+5:302016-01-08T01:46:46+5:30
पणजी : काँग्रेसचे उपाध्यक्ष मोती देसाई यांनी बुधवारी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानंतर काँग्रेस पक्षात मोठी खळबळ माजली व पक्षाला यू-टर्न घ्यावा लागला.

काँग्रेसने घेतला ‘यू-टर्न’
पणजी : काँग्रेसचे उपाध्यक्ष मोती देसाई यांनी बुधवारी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानंतर काँग्रेस पक्षात मोठी खळबळ माजली व पक्षाला यू-टर्न घ्यावा लागला. प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी नावेली विधानसभा मतदारसंघातून लढावे, अशी सूचना काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेली नाही, ते आपले व्यक्तिगत मत आहे, असे देसाई यांनी गुरुवारी आणखी एक पत्रक काढून जाहीर केले.
फालेरो यांना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नावेलीतून निवडणूक लढण्यास सांगितले आहे, असे मोती देसाई यांनी बुधवारी पत्रकात म्हटले होते. म्हणजेच फालेरो यांना गांधी यांनी नावेलीसाठी काँग्रेसचे तिकीटच जाहीर केले, असा अर्थ होतो. या विधानामुळे काँग्रेसच्या काही आमदारांना, पदाधिकाऱ्यांना व प्रमुख कार्यकर्त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. केवळ एका मतदारसंघासाठी तिकीट कसे काय जाहीर होऊ शकते, असा प्रश्न सर्वांना पडला. काँग्रेसचे प्रभारी दिग्विजय सिंग यांच्यापर्यंत त्याविषयी तक्रारी गेल्या. त्यानंतर गुरुवारी स्वत: फालेरो यांनीही एक पत्रक प्रसिद्धीस देऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
फालेरो यांनी म्हटले आहे की, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी निवडणूक लढविण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. उमेदवार निवडीसाठी काँग्रेस पक्षाकडे निश्चित प्रक्रिया आहे. गट समित्या, जिल्हा समित्या, प्रदेश निवडणूक समिती, छाननी समिती यांच्या स्तरावर उमेदवार निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर पक्षाची केंद्रीय निवडणूक समिती अंतिम निर्णय घेते. (खास प्रतिनिधी)