गोव्यात अमली पदार्थांची सर्रास विक्री : काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 15:28 IST2018-05-02T15:28:12+5:302018-05-02T15:28:12+5:30
भाजपा सरकारवर काँग्रेसचे गंभीर आरोप

गोव्यात अमली पदार्थांची सर्रास विक्री : काँग्रेस
म्हापसा : गोव्यात खास करुन किनारी भागात अमली पदार्थाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून अनेक किनारे अमली पदार्थांच्या विक्रीचे केंद्र बनले आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. सरकार आणि पोलिसांच्या आशिर्वादाने बिनबोभाटपणे हा व्यवसाय सुरु असून बेकारी वाढल्याने तरुणसुद्धा या व्यवसायाकडे आकर्षित होऊ लागल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे.
पर्यटनासाठी येणाऱ्या अनेकांनी गोव्याकडे पाठ फिरवली असून फक्त अमली पदार्थ, कॅसिनो, जुगार तसेच इतर गैरप्रकारांकडे आकर्षित होणारे पर्यटकच गोव्यात येवू लागले असल्याचा आरोपही काँग्रेसने केला. गोव्यात खास करुन उत्तर गोव्यातील किनारी भागात अमली पदार्थाच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचा आरोप आलेक्स रेजिनाल्ड यांनी केला. रात्री उशीरापर्यंत होणाऱ्या पार्ट्यातून तसेच किनाऱ्यावरील शॅकातून खुलेआम पद्धतीने अमली पदार्थाची विक्री किनारी भागात केली जाते, असंही त्यांनी म्हटलं. कळंगुटचे आमदार आणि उपसभापती मायकल लोबो यांनी पणजी तसेच वाळपई मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवेळी अमली पदार्थाच्या व्यवसायात गुंतलेला पोलिसांची नावे जाहीर करण्याची घोषणा केली होती. आता त्यांनी त्यांची नावे जाहीर करावी, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
मागील काही महिन्यांत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गांजा, चरस पकडला आहे. मात्र हा साठा हलक्या प्रतीचा होता. त्यामुळे उच्च प्रतीचे ड्रग्स पोलिसांकडून पकडले जात नसून हे ड्रग्स थेट विक्रीसाठी पुरवले जाते, असा आरोपही रेजिनाल्ड यांनी यावेळी केले. हल्लीच्या काळात पोलिसांनी कारवाई करुन टाकलेल्या छाप्यात किरकोळ व्यावसायिकांवर कारवाई करुन मोठ्या ड्रग्स माफीयांवर दुर्लक्ष करुन त्यांना सोडून दिले जाते. यातून पोलीस तसेच ड्रग्स माफियांमध्ये असलेले हितसंबंध स्पष्ट दिसून येत असल्याचे ते म्हणाले. लहान विक्रेत्यांवर कारवाई करुन भाजपा लोकांच्या डोळ्यात धूळफेक करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.