काँग्रेसचे फक्त स्वप्न, राज्यव्यापी चेहरा नाही; उमेदवार नाही, २७ जागा कशा जिंकणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 08:55 IST2026-04-12T08:54:40+5:302026-04-12T08:55:02+5:30
काँग्रेस पक्षाकडे हळूहळू तगडे उमेदवार येऊ लागले आहेत. रेडिमेड उमेदवार आणून त्यांच्यामार्फत निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने वापरला होता.

काँग्रेसचे फक्त स्वप्न, राज्यव्यापी चेहरा नाही; उमेदवार नाही, २७ जागा कशा जिंकणार?
सारीपाट, सदगुरू पाटील संपादक, गोवा
भाजपने डॉ. प्रमोद सावंत यांना राज्यव्यापी नेता म्हणून गेल्या सात वर्षांत प्रस्थापित केले आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी सातत्याने राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये गेल्या सात वर्षात दौरे केले, कार्यक्रम केले. जनसंपर्क वाढविला. काँग्रेसच्या नेत्यांना हे जमलेले नाही. अर्थात अजून वेळ आहे. युरी आलेमाव जर ही गोष्ट करू शकले तर काँग्रेससाठी ते उपयुक्त ठरेल. प्रतापसिंग राणे यांच्यानंतर काँग्रेसला राज्यव्यापी चेहरा प्राप्त झालेला नाही. काँग्रेसला अनेक मतदारसंघांमध्ये चांगले उमेदवार शोधावे लागतील. आज साखळीतदेखील काँग्रेसकडे प्रबळ उमेदवार नाही. सत्तरी तालुका व पेडणे तालुक्यातही तिच स्थिती आहे. पणजीतसुद्धा काँग्रेसकडे उमेदवारच नाही. मग २७ जागा कशा जिंकणार?
काँग्रेस पक्षाकडे हळूहळू तगडे उमेदवार येऊ लागले आहेत. रेडिमेड उमेदवार आणून त्यांच्यामार्फत निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने वापरला होता. त्यावेळी मयेचे प्रेमेंद्र शेट, पेडणेचे प्रवीण आर्लेकर यांना भाजपने आपल्या पक्षात आग्रहाने आणले. अन्यथा ते मगो पक्षाचे उमेदवार झाले असते. तसेच रवी नाईक, रोहन खंवटे यांनादेखील भाजपने अगोदरच हेरले व पक्षात घेतले होते. ज्या मतदारसंघात एखादा इच्छुक प्रबळ उमेदवार दिसतो, त्याला निवडणुकीपूर्वी आपल्या पक्षात घ्यावे हे राजकारण आता सगळीकडेच वाढू लागलेय. अन्य राज्यांतही तेच घडतेय.
काँग्रेसने परवाच अमित पालेकर यांना प्रवेश दिला. पालेकर हे सांताक्रुझ मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर प्रबळ ठरतात. ते रुदोल्फ फर्नाडिस यांना टक्कर देऊ शकतात, याची कल्पना अनेकांना आहे. सांताक्रुझमध्ये हिंदू उमेदवार जरी अलीकडील अनेक वर्षांत जिंकलेलाच नाही तरी, त्या मतदारसंघात कायम काँग्रेसचाच विजय होत आला आहे. २०२७ च्या निवडणुकीत अमित पालेकर काँग्रेसचे उमेदवार असतील. मग सांताक्रुझमधील हिंदू बहुजन मतदार कसा विचार करतील, हे आता कळणार नाही. निवडणुकीवेळीच कळेल.
भाजपच्या तिकिटावर रुदोल्फ प्रभावी ठरतील काय या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी नकारार्थी येऊ शकते. यापूर्वी टोनी फर्नाडिस, स्वर्गीय व्हिक्टोरिया व गेल्या निवडणुकीत रुदोल्फ असे ख्रिस्ती उमेदवार काँग्रेसच्या तिकिटावर जिंकत आले आहेत. २०१२ साली बाबूश मोन्सेरात काँग्रेसच्या तिकिटावर सांताक्रुझमध्ये जिंकले होते. या उलट जेनिफर मोन्सेरात सांताक्रुझमध्ये युगोडेपाच्या तिकिटावर पराभूत झाल्या होत्या. त्यावेळीही सांताक्रुझमध्ये काँग्रेस पक्षच जिंकला होता.
काँग्रेसला केतन भाटीकर यांच्याही रुपात फोंड्यात तगडा उमेदवार मिळाला. फोंड्यातील पोटनिवडणुकीवेळी भाटीकर यांना तिकीट देण्याची चाल काँग्रेसने खेळली. ही चाल सध्याच्या राजकारणाला धरूनच होती. भाटीकर यांनी पूर्ण भाजप सरकारला प्रचार काळात घाम काढला हे मान्य करावे लागेल. भाटीकर यांनी प्रचार काळात घेतलेल्या कष्टांमुळे मुख्यमंत्र्यांना वारंवार फोंड्याचे दौरे करावे लागले. सरकारमधील सगळेच मंत्री, माजी मंत्री व आमदार फोंड्यात जाऊन भाजप उमेदवारासाठी बैठका घेऊ लागले. भाटीकर जिंकतील असे प्रारंभी भाजपला वाटले होते, तसा पोलिस रिपोर्ट येत होता असे दावे केले जातात. नंतर मात्र भाजपने स्थिती बदलली, पण ती काही प्रमाणात; अशी माहिती मिळते. अर्थात कोण जिंकणार व कोण हरणार ते कुणालाच नीट कळले नव्हते, पण फोंड्यातील पोटनिवडणुकीने केतन यांच्यातील जिगर व तडफ दाखवून दिली. काँग्रेसविरुद्ध भाजपचे रितेश नाईक असा सामना रंगला होता. शेवटी पोटनिवडणूक वेगळ्या तांत्रिक कारणांमुळे न्यायालयाने रद्दबातल ठरवली हा भाग वेगळा.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी परवा विधान केले की- २०२७ साली काँग्रेस पक्षाला २७जागा जिंकायच्या आहेत. काँग्रेस २७ विधानसभा मतदारसंघात जिंकेल व सरकार घडतील, असा दावा युरीने केला आहे. युरी यांनाही कमी वयात कुंकळ्ळीचे आमदारपद आणि नंतर लगेच विरोधी पक्षनेते होण्याची संधी मिळाली. युरी यांनी स्वतःची इमेज सांभाळली आहे. युरी म्हणजे चर्चिल आलेमाव नव्हेत किंवा युरी म्हणजे ज्योकिम किंवा मिकी पाशेकोही नव्हेत. युरींनी राजकीय सभ्यता जपली आहे. मात्र हिंदू बहुजन समाजावर आपला प्रभाव टाकण्याचे कौशल्य युरींना अजून प्राप्त झालेले नाही. त्यांना आपण सासष्टीचाच नेता आहे ही प्रतिमा दूर करावी लागेल. त्यासाठी उत्तर गोव्यातील प्रत्येक मतदारसंघात खूप फिरावे लागेल.
हिंदू सणांमध्ये, हिंदू उत्सवांमध्ये, देवस्थानांच्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यावा लागेल. अन्यथा काँग्रेस २७ जागा जिंकेल असे म्हणणे विनोदाचे ठरेल. फोंड्यातील पोटनिवडणुकीवेळी युरी आलेमाव यांनी खूप काम केले. खूप कष्ट घेतले, पण काँग्रेसमधील भंडारी समाजातील अनेकजण लपून राहिल्यासारखीच स्थिती होती. अनेकजण फोंड्यात गेलेदेखील नाहीत. काँग्रेस पक्षातील हे कल्चर बदलावे लागेल. अन्यथा २०२७ साली सत्ता मिळणे कठीणच आहे. भाजपला टक्कर देणे हे काँग्रेससाठी अजूनदेखील सोपे काम नाहीच.
जनआंदोलने जरी सगळीकडे सुरू असली तरी, काँग्रेसला त्या असंतोषाचा लाभ उठविता येत नाही. कारण काँग्रेस हा कायम निवडणुकीच्या मूडमध्ये असत नाही. केवळ निवडणूक आली की मगच धावपळ करून कसाबसा प्रचार केला जातो. काँग्रेसकडे आज देखील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून राज्यव्यापी प्रभावी नेता नाही. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांना हे ठाऊक आहे. विजयलाही अजून उत्तर गोव्यात मतदारांनी स्वीकारलेले नाही. युरी, अमित पाटकर, विजय किंवा एल्टन, कार्ल्स या सर्व नेत्यांना मर्यादा आहेत. या उलट भाजपने डॉ. प्रमोद सावंत यांना राज्यव्यापी नेता म्हणून गेल्या सात वर्षांत प्रस्थापित केले आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी सातत्याने राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये गेल्या सात वर्षांत दौरे केले, कार्यक्रम केले. जनसंपर्क वाढविला. काँग्रेसच्या नेत्यांना हे जमलेले नाही. अर्थात अजून वेळ आहे. युरी आलेमाव जर ही गोष्ट करू शकले, तर काँग्रेससाठी ते उपयुक्त ठरेल.
प्रतापसिंग राणे यांच्यानंतर काँग्रेसला राज्यव्यापी चेहरा प्राप्त झालेला नाही. दिगंबर कामत पूर्वी पाच वर्षांत काँग्रेसचे मोठे नेते म्हणून उदयास आले होते, पण ते आता भाजपमध्ये आहेत. काँग्रेस पक्षाने २७ जागांचे स्वप्न पाहिले खरे; पण अशी स्वप्ने केवळ पेपरमध्ये हेडलाइनपुरतीच असतात. त्या पलीकडे काही घडत नसते. स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांनी विरोधी पक्षनेतेपदी असताना काढलेले कष्ट आठवले तर युरी आलेमाव यांना वस्तुस्थिती कळून येईल.
विधानसभा निवडणुकीचा काळ झपाट्याने जवळ येत आहे. काँग्रेसला अनेक मतदारसंघांमध्ये चांगले उमेदवार शोधावे लागतील. आज साखळीतदेखील काँग्रेसकडे प्रबळ उमेदवार नाही. सत्तरी तालुका व पेडणे तालुक्यातही तिच स्थिती आहे. पणजीतसुद्धा काँग्रेसकडे उमेदवारच नाही. मग २७ जागा कशा जिंकणार?