कंपन्यांनी उघड्यावर कचरा टाकणे थांबवावे; मुख्यमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 10:26 IST2025-08-15T10:22:51+5:302025-08-15T10:26:15+5:30
घन कचऱ्यावरून आस्थापनांना सुनावले; पिसुर्ले येथे औद्योगिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन

कंपन्यांनी उघड्यावर कचरा टाकणे थांबवावे; मुख्यमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क, होंडा : 'स्वच्छ गोवा, हरित गोवा' हे स्वप्न साकार करण्यासाठी विविध प्रकारच्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया झाली पाहिजे, त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. औद्योगिक वसाहतीत निर्माण होणाऱ्या हानिकारक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा. यापुढे उघड्यावर धोकादायक कचरा टाकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करू, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.
पिसुर्ले औद्योगिक वसाहतीत गुरुवारी फोंडा एन्व्होकेअर लिमिटेड कंपनीच्या राज्यातील पहिल्या औद्योगिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे, गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हरिष हडकोणकर, कचरा व्यवस्थापन सल्लागार पद्मश्री डॉ. शरद काळे, विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव महेश शंभू, संचालक डॉ. स्नेहा गित्ते, किरण चिपकर, कंपनीचे मालक तथा राज्यसभेचे माजी खासदार अजय संचिती, संचालक परम संचिती मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पामुळे राज्यातील युवा वर्गाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतीलच. शिवाय सामाजिक विकासाला चालनाही मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी सामूहिक जबाबदारी घेऊन विविध प्रकारच्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी झटावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
दरम्यान, गोवा कचरा व्यवस्थापन व्यवस्थापकीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हरिष हडकोणकर, विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव महेश शंभू यांनी कचरा व्यवस्थापन संबंधी माहिती दिली. कंपनीचे संचालक परम संचेती यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी हिने केले तर हसन हुसेन यांनी आभार मानले.
दरम्यान, देशातील ९ राज्यात कंपनीचे कचरा व्यवस्थापन करण्याचे प्रकल्प आहेत, त्यात महाराष्ट्रातील रांजणगाव देशात येथील सर्वात्कृष्ट प्रकल्प ठरला आहे. कंपनीचे सर्व कामकाज शासकीय नियमानुसार चालत आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, असे माजी खासदार अजय संचेती यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'एसएमएस' या ग्रुपचे अध्यक्ष अजय संचेती यांनी हा प्रकल्प गोव्यात आणला, त्यामुळे गोवा सरकारच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
या प्रकल्पामुळे राज्यातील विविध औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या कंपन्यांतील घातक घन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मदत होणार आहे. या ठिकाणी अशा प्रकारचा कचरा प्रकल्प उभारून या कंपनीने गोव्यात १०० वर्षे कचरा व्यवस्थापन करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे सर्व औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या कंपन्यांनी आपला औद्योगिक कचरा या प्रकल्पाला पुरवावा.
कंपनीने पर्यावरणाचा समतोल राखावा : राणे
आमदार दिव्या राणे म्हणाल्या की, पर्ये मतदारसंघातील पिसुर्ले पंचायत क्षेत्रात असलेल्या औद्योगिक वसाहतीत हा प्रकल्प उभारण्यात आल्याने याचा या परिसराला फायदा होणार आहे. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर कंपनीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मात्र, या कार्यक्रमास पिसुर्ले पंचायत मंडळ उपस्थित राहिलेले नाही. लवकरच कंपनी व्यवस्थापन व पंचायत मंडळ यांच्यात समझोता घडवून आणू, असेही दिव्या राणे म्हणाल्या.