मुख्यमंत्र्यांना प्रत्येकाचे काम माहीत; ते योग्य निर्णय घेतील!: सुभाष फळदेसाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 08:28 IST2025-03-20T08:27:34+5:302025-03-20T08:28:20+5:30
सहा वर्षपूर्तीबद्दल केले अभिनंदन

मुख्यमंत्र्यांना प्रत्येकाचे काम माहीत; ते योग्य निर्णय घेतील!: सुभाष फळदेसाई
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेऊन कामगिरी न दाखविलेल्या मंत्र्याला वगळण्याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. त्यांना प्रत्येक मंत्र्यांचे काम माहिती आहे. त्यामुळे भविष्यात जे काही बदल होतील त्याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, अशी माहिती देताना समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले.
डॉ. प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारर्किदीला काल, बुधवारी सहा वर्षे झाली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी काल पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री फळदेसाई बोलत होते. त्यांच्यासोबत आमदार डिलायला लोबो, भाजपचे प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळ्येकर व आमदार केदार नाईक उपस्थित होते.
मंत्रिमंडळातील बदलाबाबत विचारले असता फळदेसाई म्हणाले की, मुख्यमंत्री मंत्र्यांच्या कामाचा नियमितपणे आढावा घेत आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या कामाबद्दल त्यांना माहिती आहे. त्यामुळे कोणाला डच्चू या निर्णयावर भाष्य करण्याचा अधिकार आम्हा मंत्र्यांना नाही, असेही ते म्हणाले.
मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याची धुरा समर्थपणे सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विपरीत परिस्थितीत राज्याला सावरले. कोविड महामारीसारख्या जीवघेण्या संकट काळात मुख्यमंत्री सावंत यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. त्यामुळेच निवडणुकीत जनतेने पुन्हा त्यांना मुख्यमंत्री बनविले. पक्ष, मंत्री यांच्यात चांगला समन्वयाचे कामही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यांच्या स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाचे पंतप्रधान मोदी यांनीही कौतुक केल्याचे फळदेसाई म्हणाले.