मुख्यमंत्री प्रमोद सावंत करताहेत करिअर मार्गदर्शन; कौशल्य विकासावर भर देण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 07:56 IST2025-07-21T07:55:11+5:302025-07-21T07:56:11+5:30

राज्याच्या कानाकोपऱ्यात आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, करिअर निवडताना कोणती काळजी घ्यावी? काय निवडावे? याबाबत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करत आहेत. 

cm pramod sawant is providing career guidance advises students to focus on skill development | मुख्यमंत्री प्रमोद सावंत करताहेत करिअर मार्गदर्शन; कौशल्य विकासावर भर देण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला

मुख्यमंत्री प्रमोद सावंत करताहेत करिअर मार्गदर्शन; कौशल्य विकासावर भर देण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला

विशांत वझे, लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: उच्च माध्यमिक स्तरावर विद्यार्थी आपल्या करिअरबाबत गोंधळलेले असल्याचे सातत्याने निदर्शनास येते. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. करिअर निवडीसंदर्भात पालक शिक्षक व विद्यार्थी यांची खरी कसोटी असते. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे त्यासाठी मार्गदर्शक बनले आहेत. ते राज्याच्या कानाकोपऱ्यात आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, करिअर निवडताना कोणती काळजी घ्यावी? काय निवडावे? याबाबत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करत आहेत. 

आपल्या मुलांनी दहावीनंतर कुठल्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा याबाबत गोंधळलेल्या पालकांना मुख्यमंत्री सातत्याने जागृत करत आहेत. कला, विज्ञान, वाणिज्य या पारंपरिक शाखांसह देशभरात कौशल्य विकासांतर्गत रोजगाराभिमुख शिक्षण घेण्यासाठी मुख्यमंत्री अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने मार्गदर्शन करताना दिसून येत आहेत.

वेगवेगळ्या कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री शिक्षकांच्या योगदानाबाबतही सातत्याने उल्लेख करताना दिसतात. शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने विद्यार्थ्यांची आकलन शक्ती, त्यांची गुणवत्ता व नेमका कोणत्या क्षेत्रात त्यांचा कल आहे, हे शिक्षक चांगल्या प्रकारे ओळखू शकतात, शिक्षकांनी ही जबाबदारी प्रामाणिकपणे स्वीकारावी, यासाठी मुख्यमंत्र्यांचा सतत आग्रह असतो.

गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्र्यांनी करिअर मार्गदर्शनासंदर्भात बहुतेक सर्वच कोर्सेसची माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने, अगदी सहजपणे आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आहे. रोजगाराभिमुख शिक्षण घेताना तुमचे कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे, तुम्हाला नेमके कोणत्या क्षेत्रात जायचे आहे याची मानसिकता तयार असायला हवी आणि त्या अनुषंगानेच तुम्ही शैक्षणिक प्रवास स्वीकारायला हवा असे सांगत मुख्यमंत्री जागृती करतात.

व्यवसाय उभारण्याचा सल्ला

युवकांनी नावीन्याचा ध्यास घेऊन वेगळे काहीतरी करावे. मात्र, सरकारी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय उभारावेत व इतरांना नोकऱ्या देण्यासाठी प्रयत्न करावेत, सरकार सर्व प्रकारचे सहकार्य देण्यास तुम्हाला सतत तत्पर आहे, असेही मुख्यमंत्री सावंत आपल्या मार्गदर्शनात सातत्याने सांगत असतात.

संकल्प सिद्धीचे प्रयत्न

मुख्यमंत्र्यांनी गेल्या सहा वर्षात स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर गोव्याचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी शेकडो कार्यक्रमांत अतिशय तळमळीने मार्गदर्शन केलेले आहे. स्वतःच करिअर मार्गदर्शक बनून मुख्यमंत्री विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांनी अनेक रोजगार मेळावे भरवले आहेत. विविध योजनांतून ते वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण योजना आखून युवाशक्तीला मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी सातत्याने ते प्रयत्नशील आहेत.

शिक्षण संधी तुमच्या येतेय दारापर्यंत...

सध्या वेगवेगळ्या कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हजारो संधी तुमच्या दारापर्यंत येऊन तुम्हाला सन्मानाने रोजगार देण्याची संधी पाहत आहेत. त्या अनुषंगाने आदरातिथ्य, हॉटेल व्यवसाय, आयटीआयच्या माध्यमातून उपलब्ध कोर्सेस, नर्सिंग, वैद्यकीय क्षेत्र, आयुष-योग या क्षेत्रांबरोबरच नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्रात, विज्ञान, सांस्कृतिक व वाणिज्य क्षेत्रात कौशल्य विकसित करा, तुम्हाला खूप मोठ्या संधी आहेत, असे मुख्यमंत्री सातत्याने मार्गदर्शन करताना दिसतात. त्याचा फायदा विद्यार्थी, पालकांना होत आहे.

आजचा युवक हा आधुनिक युगातही गोंधळलेल्या अवस्थेत आहे. त्याला नेमके कोणते क्षेत्र निवडावे, याबाबत नेमकी माहिती नसते. त्यामुळे युवकांना योग्य मार्गदर्शन व दिशा दाखवण्यासाठी करिअर समुपदेशक, उत्तम मार्गदर्शकाची गरजच आहे. शिक्षक, पालकांनी यासंदर्भात अतिशय जागरूकपणे आपली भूमिका बजावणे गरजेचे आहे. पालकांना वाटते म्हणून मुलांना चुकीच्या क्षेत्रात जाण्यासाठी दबावतंत्राचा वापर करू नये, अशी माझी भूमिका आहे. त्यामुळे मी सातत्याने संधी मिळेल त्या कार्यक्रमात करिअर मार्गदर्शनाचा प्रयत्न करतो. ते मला खूप आवडते. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
 

Web Title: cm pramod sawant is providing career guidance advises students to focus on skill development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.