मुख्यमंत्र्यांना केंद्राचे आशीर्वाद; दिल्लीत अनेक नेत्यांच्या गाठीभेटी यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 07:28 IST2025-03-20T07:27:51+5:302025-03-20T07:28:27+5:30
गोव्यातील विविध विषयांवर केली चर्चा

मुख्यमंत्र्यांना केंद्राचे आशीर्वाद; दिल्लीत अनेक नेत्यांच्या गाठीभेटी यशस्वी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल मुख्यमंत्रीपदाच्या आपल्या कारकिर्दीची सहा वर्षे पूर्ण केली आहेत. दिल्लीत त्यांनी त्यानिमित्ताने विविध केंद्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. केंद्र सरकारने विविध बाबतीत मुख्यमंत्री सावंत यांना आशीर्वाद दिला आहे.
मंगळवारी मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटले होते. दुसऱ्या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही त्यांनी भेट घेतली. गोव्यातील काही प्रकल्पांविषयी चर्चा केली. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही मुख्यमंत्री भेटले. केंद्रीय रेल्वे मंत्री व इतरांचीही त्यांनी भेट घेतली. मंत्रिमंडळ फेररचना ही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडल्यानंतर एप्रिलमध्ये होईल, असे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना वाटते.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय सागरमाला सर्वोच्च समितीच्या बैठकीला उपस्थित राहून संबोधित केले. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, किनारी राज्यांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ सरकारी अधिकारीही उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्री सावंत यांनी सागरमाला अंतर्गत सरकारने सुरू केलेल्या विविध प्रकल्पांवर प्रकाश टाकला.
मुख्यमंत्री सावंत यांनी कौशल्य वाढ, सामाजिक आणि आर्थिक समावेश आणि आर्थिक वाढीवर लक्ष केंद्रित करून किनारी विकासाचे महत्त्व विषद केले. किनारी प्रदेशांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी सरकार रो-रो सेवा आणि वॉटर मेट्रोसारखे नवीन मार्ग देखील शोधत आहे.
राष्ट्रीय सागरमाला शिखर समितीची बैठक भारतातील बंदर-नेतृत्वाखालील विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने सागरमाला कार्यक्रमाच्या विविध पैलूंवर चर्चा आणि विचारविनिमय करण्यासाठी भागधारकांना एक व्यासपीठ प्रदान करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी सागरमाला बैठकीत बंदरांचे आधुनिकीकरण व जेटींचे बळकटीकरण करणे हे गोव्यात पर्यटन आणि दैनंदिन प्रवास वाढवणे असल्याचेही त्यांनी सांगितले.