गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 10:50 IST2025-05-03T10:48:47+5:302025-05-03T10:50:05+5:30

CM Pramod Sawant First Reaction Over Goa Lairai Devi Jatrotsav Stampede: लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी झाल्यावर अनेक भाविकांना शॉक बसल्याचे म्हटले जात आहे. चेंगराचेंगरी झाली तेव्हा पोलीस मोठ्या संख्येने होते. पण प्रचंड गर्दी आटोक्यात आणणे शक्य झाले नाही.

cm pramod sawant first reaction over goa lairai devi jatrotsav stampede incident | गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”

गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”

CM Pramod Sawant First Reaction Over Goa Lairai Devi Jatrotsav Stampede: शिरगाव येथील प्रसिद्ध लईराई देवीच्या जत्रोत्सवात सहभागी होण्यासाठी दरवर्षी ५० हजार भाविक येत असतात. त्यातील अग्निदिव्य कुंडात सहभाग घेतात. लईराई देवीचे दर्शन घेतात. मंदिर समिती आणि पोलीस प्रशासन नेहमीच या जत्रोत्सवात चोख व्यवस्था ठेवतात. लईराई जत्रोत्सवात अशा प्रकारची दुर्घटना घडणे अत्यंत दुःखद असून, अशा प्रकारे यापूर्वी कधीही घटना घडली नाही, अशी प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. तसेच खासदार श्रीपाद नाईक आणि गोवा भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि  लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील प्रसिद्ध देवी लईराईच्या जत्रोत्सवात शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. यात सहा भाविकांचा मृत्यू झाला असून, ५० हून अधिक जखमी झाले आहेत. तर यातील १५ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा आढावा घेतला. तसेच डिचोली, गोमेकॉ इस्पितळात जाऊन मृतांच्या नातेवाईकांची व जखमींची भेट घेतली. यानंतर मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

घटनास्थळी आणि रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला

शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रोत्सवात शनिवारी पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची दुर्घटना घडली. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ५० जण जखमी झाले. मला ५ वाजता या घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी पोहोचलो. पोलिसांकडून बचावकार्याला सुरुवात झाली होती. परिस्थिती नियंत्रणात होती. या दुर्घटनेत रुग्णालयात जायच्या आधीच सहा जणांचा मृत्यू झाला होता. आरोग्य केंद्रात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. अनेक जखमींवर उपचार सुरू आहेत. काही जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. तिथे जाऊनही परिस्थितीचा आढावा घेतला, अशी माहिती प्रमोद सावंत यांनी दिली. 

प्रशासनाकडून सर्व प्रकारची मदत करत आहोत

या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी फोनवरून संवाद साधला. या दुर्घटनेची माहिती पंतप्रधान मोदी यांनी घेतली. तसेच सर्वतोपरि मदत करण्याचे आश्वासन दिले. आम्ही जखमींवर योग्य पद्धतीने उपचार करत आहोत आणि बाकीची व्यवस्थाही पाहत आहोत. ज्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला, त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करतो. जे जखमी आहेत, त्यांना प्रशासनाकडून सर्व प्रकारची मदत करत आहोत. गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य केंद्रातील डॉक्टर जखमींवर उपचार करत आहेत. ही दुर्घटना का घडली, याची चौकशी करण्याचे निर्देश पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, असेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नमूद केले. 

तीन दिवस सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करत आहोत

गोव्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची दुःखद घटना झाली. त्यामुळे पुढील तीन दिवस सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करत आहोत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, लईराईच्या जत्रेत स्टॉल उभारण्यात आले आहेत. चेंगराचेंगरीवेळी यातील काही स्टॉलवर भाविक पडले. त्याचवेळी स्टॉलना पुरवण्यात आलेल्या वीज केबल्सना भाविकांचा स्पर्श होऊन अनेकांना शॉक बसल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान,  प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षीपेक्षा यंदा लईराईच्या जत्रेत मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. पहाटे तीनच्या सुमारास अग्निदिव्य सुरू असताना अचानक चेंगराचेंगरी सुरू झाली. यावेळी गर्दीत अनेकजण खाली पडले. यात श्वास कोंडल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. घटना घडली त्यावेळी पोलिसही मोठ्या संख्येने हजर होते. मात्र, गर्दी आटोक्यात आणणे शक्य झाले नाही.

 

Web Title: cm pramod sawant first reaction over goa lairai devi jatrotsav stampede incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.