ग्रामस्थांच्या लढ्याला यश आले, ४४ दिवसानंतर आंदोलन घेतले मागे; प्रकल्प स्थलांतराचा आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 12:18 IST2026-02-10T12:17:49+5:302026-02-10T12:18:36+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत मागण्या मान्य, चिंबलवासीयांचा आनंदोत्सव

chimbel villagers struggle was successful protest withdrawn after 44 days project relocation order issued | ग्रामस्थांच्या लढ्याला यश आले, ४४ दिवसानंतर आंदोलन घेतले मागे; प्रकल्प स्थलांतराचा आदेश जारी

ग्रामस्थांच्या लढ्याला यश आले, ४४ दिवसानंतर आंदोलन घेतले मागे; प्रकल्प स्थलांतराचा आदेश जारी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ या प्रकल्पांविरोधात मागील ४४ दिवसांपासून लढा पुकारलेल्या चिंबलवासीयांचा मोठा विजय झाला आहे. हे दोन्ही प्रकल्प दुसऱ्या जागी स्थलांतरित केले जातील असे दोन स्वतंत्र आदेश राज्य सरकारने सोमवारी जारी केले. त्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले. याबाबत ग्रामस्थांनी आझाद मैदानावर साखळी आंदोलन सुरू केल्यानंतर दुपारी तीन वाजता उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी चिंबल ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनासोबतच्या बैठकीत ग्रामस्थांच्या मागण्यांवर चर्चा करून युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ हे प्रकल्प चिंबल येथून दुसऱ्या गावात स्थलांतरित केले जात असल्याचे दोन स्वतंत्र लेखी आदेश जारी करण्यात आले. या बैठकीस पर्यटन खाते, वेटलैंड अथॉरिटी, सर्वसाधारण प्रशासन खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

चिंबल ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी पणजीतील आझाद मैदानावर धडक दिली. सरकार मागण्या मान्य करेपर्यंत मागे हटणार नाही, दोन्ही प्रकल्प दुसऱ्या जागी हलविण्यात आल्याचे कायदेशीर व संविधानिक प्रक्रिया पाळून दोन वेगवेगळे लेखी आदेश द्यावेत. आम्हाला तोंडी आश्वासन नको, त्यासाठी सरकारला एक दिवसाची मुदत देण्यात येत आहे, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर प्रशासनाच्या पातळीवर गतीने हालचाली झाल्या.

आंदोलकांच्या डोळ्यात आनंदाश्रू

पणजी येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणाऱ्या चिंबलवासीयांनी आपल्या या विजयाचा आनंद अक्षरशः नृत्य करून तसेच फुगडी घालून साजरा केला. उपस्थित सर्वांनी पेढे, तसेच गोड पदार्थ एकमेकांना भरवले. यावेळी अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसून येत होते.

नेमकी मागणी काय?

युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ या प्रकल्पामुळे चिंबल गाव व तेथील तोयार तळी धोक्यात येण्याची भीती होती. येथील जैवविविधता नष्ट होईल. तसेच प्रकल्पाबाबत ग्रामस्थांना विश्वासात घेतले नाही असे सांगत दोन्ही प्रकल्पांमुळे स्थानिकांना रोजगार मिळण्याचा सरकारचा दावा खोटा असल्याची सरकारची भूमिका. त्यामुळे प्रकल्पास विरोध.

आंदोलनावेळी सामाजिक कार्यकर्ते क्लॉड आल्वारिस, अॅड. नॉर्मा आल्वारिस, स्वप्नेश शेर्लेकर, अॅड. सिमॉईश, आम आदमी पक्षाचे गोवा अध्यक्ष वाल्मिकी नायक व अन्य उपस्थित होते.

असे झाले आंदोलन

२८ डिसेंबर २०२५ रोजी सुरुवात
४ जानेवारी : महासभा, आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार
११ जानेवारी : सांताक्रूझचे आमदार रुदोल्फ फर्नाडिस यांच्या घरावर मोर्चा
१५ जानेवारी : विधानसभेवर आंदोलकांची धड़क
२५ जानेवारी : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांच्या घरावर नेला मोर्चा
२८ जानेवारी: दोन्ही प्रकल्प रद्द केल्याचे पर्यटन संचालकांकडून प्रसिद्धीपत्रक
३० जानेवारी : लेखी आदेश मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची ग्रामस्थांची भूमिका

हा केवळ चिंबलच्या नागरिकांचा विजय आहे. आम्ही गावासाठी लढलो. या लढ्यात आम्हाला महिला भगिनींचाही मोठा पाठिंबा लाभला. सोमवारी सकाळी जेव्हा आम्ही धरणे आंदोलन करण्यासाठी आझाद मैदानावर आलो, तेव्हा येथे रात्रभर राहाण्याचा निर्धार केला होता. मात्र सरकारला आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागल्या आणि लेखी आदेश देण्यात आला. - अजय खोलकर, आंदोलकांचे नेते

Web Title : जीत! ग्रामीणों का संघर्ष सफल; 44 दिनों के बाद परियोजना स्थानांतरण का आदेश।

Web Summary : चिंबले के ग्रामीणों ने यूनिटी मॉल के खिलाफ 44 दिनों का विरोध जीता। सरकार ने विरोध और बैठकों के बाद परियोजनाओं के स्थानांतरण का आदेश दिया। ग्रामीणों ने नाच-गाकर और मिठाई बांटकर खुशी मनाई, राहत मिली कि उनका गांव और उसकी जैव विविधता अब सुरक्षित है। उनके दृढ़ संकल्प से लिखित आदेश जारी हुए, जिससे प्रदर्शन समाप्त हो गया।

Web Title : Victory! Villagers' struggle succeeds; project relocation ordered after 44-day protest.

Web Summary : Chimbale villagers won their 44-day protest against Unity Mall. The government ordered relocation of projects after protests and meetings. Villagers celebrated with dancing and sweets, relieved that their village and its biodiversity are now protected. Their persistence led to written orders, ending the demonstration.