आता माघार घेणार नाही!; आंदोलन आणखी तीव्र करण्याचा घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 08:43 IST2026-01-25T08:42:08+5:302026-01-25T08:43:25+5:30
युनिटी मॉल प्रकल्पाविरोधात चिंबलवासीयांचा निर्धार, सरकारविरोधात मोर्चाची तयारी; श्रीपादभाऊंना आज भेटणार

आता माघार घेणार नाही!; आंदोलन आणखी तीव्र करण्याचा घेतला निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : चिंबल येथे प्रस्तावित युनिटी मॉल प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, आंदोलन आणखी तीव्र करण्याचा ठाम निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आज, २५ रोजी उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या कार्यालयात जाऊन, प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकल्पाबाबत त्यांची स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती चिंबलवासीयांनी शनिवारी रात्री झालेल्या जाहीर सभेत दिली.
सरकारकडून युनिटी मॉल प्रकल्प रद्द करण्याबाबत कोणतीही ठोस हालचाल दिसून येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे सोमवार, २६ रोजी ताळगाव येथील गोवा विद्यापीठ मैदानावर आयोजित शासकीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रमावेळी आंदोलन छेडण्यात येणार आहे. यानंतर शुक्रवार, ३० रोजी पणजी येथे भव्य मोर्चा काढून सरकारविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येईल. हे आंदोलन 'करो या मरो' या भूमिकेतूनच होणार असल्याचे स्पष्ट संकेत सामाजिक कार्यकर्ते अजय खोलकर यांनी दिले. चिंबलवासीय गेल्या २८ दिवसांपासून युनिटी मॉल प्रकल्पाविरोधात सातत्याने आंदोलन करीत आहेत.
पणजी ते जुने गोवे कदंब बायपास परिसरात नागरिकांनी साखळी उपोषण सुरू ठेवले आहे. मात्र, एवढ्या तीव्र जनआंदोलनानंतरही सरकारने हा प्रकल्प रद्द करण्याबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. 'युनिटी मॉल हा प्रकल्प रद्दच व्हायला हवा, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. या विषयावर कोणतीही तडजोड होणार नाही,' असा स्पष्ट इशाराही ग्रामस्थांनी दिला.
२६ जानेवारी ताळगाव येथील गोवा विद्यापीठ मैदानावर आयोजित शासकीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रमावेळी आंदोलन. ३० जानेवारी पणजी येथे भव्य मोर्चा काढून सरकारविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार.
लढा सुरूच राहणार : खोलकर
अजय खोलकर म्हणाले की, सध्या चिंबल परिसरात सरकारकडून तोयार तळ्याच्या सीमांकनाचे तसेच पाणथळ जागेच्या सीमांकनाचे काम सुरू आहे. मात्र, केवळ सर्वेक्षण सुरू झाले म्हणजे युनिटी मॉल प्रकल्प रद्द होणार, असा अर्थ काढता येणार नाही. हे काम केवळ तोयार तळे आणि पाणथळ क्षेत्राच्या सीमांकनापुरते मर्यादित आहे. त्यामुळे जोपर्यंत युनिटी मॉल प्रकल्प रद्द करण्याचा अधिकृत निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. मागण्या मान्य होईपर्यंत लढा अखंड सुरूच राहील, असा ठाम इशारा त्यांनी दिला.
'भाऊं'नी उत्तर द्यावे
चिंबल येथील युनिटी मॉल प्रकल्प हा केंद्र सरकारचा प्रकल्प असून उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक हे केंद्रात राज्यमंत्री आहेत. मात्र, या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असतानाही त्यांनी अद्याप याची दखल घेतलेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे खासदारांनी या प्रकल्पाबाबत आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी, या मागणीसाठी त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रत्यक्ष भेट घेण्याचा निर्णय घेतल्याचे चिंबलवासीयांनी स्पष्ट केले.