शिवरायांनीच दिला 'स्वराज'चा मंत्र: मंत्री विश्वजीत राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:59 IST2026-02-20T11:57:53+5:302026-02-20T11:59:37+5:30
उसगावात शिवजयंती जल्लोषात; ढोल-ताशे, स्पर्धांनी रंगला उत्सव

शिवरायांनीच दिला 'स्वराज'चा मंत्र: मंत्री विश्वजीत राणे
लोकमत न्यूज नेटवर्क, उसगाव : "स्वराज म्हणजे आत्मसन्मानाने, स्वतःचे नियम राबवत उभारलेला स्वदेशी राज्यकारभार. मुघल, आदिलशाही व निजामशाही सत्तांविरुद्ध स्वराज्य स्थापनेसाठी 'स्वराज' ही संकल्पना सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले. उसगाव बाराजण येथे शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंती कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
काल गुरुवारी उसगाव परिसर भगव्या रंगात न्हाऊन निघाला होता. ढोल-ताशांचा गजर, जोशपूर्ण पोवाडे आणि पारंपरिक वेशभूषेतील तरुणाईच्या सहभागामुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले. शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. उसगावात भगवे ध्वज, ढोल-ताशांचा गजर, पोवाडे आणि पारंपरिक वेशभूषेत तरुणाईने सहभाग घेत शिवरायांना अभिवादन केले.
उसगाव क्षेत्र मर्यादित विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज, बालशिवाजी आणि जिजामाता वेशभूषा व पोवाडे स्पर्धा आयोजित करून शिवरायांचे विचार घराघरांत पोहोचवण्यात आले. सकाळी उसगाव बाराजण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक सर्कल मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व राजमुद्रेची पूजा करण्यात आली.
उसगाव बाराजण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक सर्कल मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास मंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तेथून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक उसगाव पंचायतीच्या जुन्या इमारतीकडे आली. पंचायतीच्या आवारात मुख्य कार्यक्रम सादर करण्यात आला.
यावेळी मंत्री विश्वजित राणे यांच्यासह शिवप्रेमी प्रदीप बखले, उसगावचे सरपंच संजय गावडे, उपसरपंच संगीता डोईफोडे, पंच रामनाथ डांगी, गोविंद परब फात्रेकर, राजेंद्र नाईक, रेश्मा मटकर, नरेंद्र गावकर, वैभवी गावडे, विनोद मास्कारेन्स, विलियम मास्कारेन्हस, उसगाव जिल्हा पंचायत सदस्य समीक्षा नाईक, माजी उसगाव जि.पं. सदस्य उमाकांत गावडे, फोंडा गटविकास अधिकारी आश्विन देसाई, विनोद शिंदे, शिवाजीच्या वेशभूषेत राजेश बोरकर उपस्थित होते. विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण केले. स्वागत संजय ऊर्फ प्रकाश गावडे यांनी केले. सूत्रसंचालन अजय बागकर व मयूर बाळवे यांनी केले.