अमित पालेकर यांच्यासह सात जणांविरुद्ध आरोपपत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 07:50 IST2025-10-14T07:49:52+5:302025-10-14T07:50:16+5:30
क्राईम ब्रँचकडून या प्रकरणात पणजी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात सर्व सात आरोपींना आरोपपत्रे देण्यात आली.

अमित पालेकर यांच्यासह सात जणांविरुद्ध आरोपपत्र
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बाणस्तारी अपघात प्रकरणात उद्योजक परेश सावर्डेकर, आम आदमी पार्टीचे निमत्रक अॅड. अमित पालेकर यांच्यासह ७ जणांना आरोपपत्रे देण्यात आली. येथील अपघात प्रकरणात त्यांच्यावर आरोपपत्र ठेवण्यात आले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय दंडसंहिता कलम १२० (ब) अंतर्गत कारस्थान रचण्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवला आहे.
क्राईम ब्रँचकडून या प्रकरणात पणजी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात सर्व सात आरोपींना आरोपपत्रे देण्यात आली. श्रीपाद ऊर्फ परेश सावर्डकर, अमित पालेकर, गणेश लमाणी, अभिजित शेट्ये, विष्णू तारकर, अत्रेय सावंत आणि प्रज्योत चोडणकर अशी त्यांची नावे आहेत. आरोपपत्र हे १३०० हून अधिक पानांचे आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. अपघात प्रकरणात भा. द स १२० (ब) कलमा अंतर्गत कारस्थान रचण्याचाही आरोप ठेवला गेला आहे. शिवाय पुरावे नष्ट करण्याचा, सदोष मनुष्यवधाचा व इतर आरोपही ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, अपघाताच्या प्रकरणांत सहसा कारस्थानाचा गुन्हा नोंदविला जात नाही. मात्र, यात हे कलम लावण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
६ ऑगस्ट २०२३ रोजी परेश सावर्डेकर याने दारुच्या नशेत बेफामपणे मर्सिडिस कार चालवून केलेल्या तिघांचा जीव घेतला होता. त्यानंतर चालक परेश याला या प्रकरणातून वाचविण्यासाठी तोतया चालक त्या ठिकाणी हजर केल्याचा आरोप करत पालेकरसह इतरांवर गुन्हा नोंदविला होता.