गंगाराम म्हांबरे, ज्येष्ठ पत्रकार
बदल ही काळाची गरज आहे. काळानुसार प्रत्येक गोष्टीत बदल होत असतात. तसे करण्यात आपण मागे राहिलो तर अक्षरशः मागेच पडतो. राजकारणातही देशात असे बदल होताना दिसतात. नवे चेहरे, नवे विचार, नवा दृष्टिकोन यावर भर देणारा राजकीय पक्ष घोडदौड करतो, तर जुन्यांना कवटाळून राहाणारी संघटना नेहमी मागेच पडते. जनतेलाही सतत तेच नेते, तेच चेहरे, तेच विचार ऐकून कंटाळा आलेला असतो. त्यामुळे उत्साही आणि परिपक्व, चौफेर विचार करू शकणारा युवानेता पुढे आला, तर जनता त्याला समर्थन देते. जिल्हा पंचायत निवडणुकांतील उमेदवारांची नावे पाहाता, भाजपने योग्य निर्णय घेतला आहे. हा पक्ष याबाबत नेहमीच पद्धशीरपणे पुढे जात असतो. असे करताना राज्यातील आगामी राजकारणाचा विचार सर्वांनीच करण्याची गरज आहे.
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे केवळ गोव्यासाठीच नव्हे, तर भाजपला त्यांनी दिलेले योगदान फार मोठे आहे. समविचारी सहकाऱ्यांना सोबत घेत त्यांनी भाजपला ज्या उंचीवर नेऊन बसवले, त्याबाबत कोणाचे दुमत असणार नाही. हाच मुद्दा पुढे नेत असे म्हणावेसे वाटते की, सुशिक्षित, संयमी आणि विचारी अशी प्रतिमा असलेला उत्पल पर्रीकर ही खरे तर स्व. मनोहर पर्रीकर यांची राज्याला मिळालेली देण आहे. असंख्य गोमंतकीयांशी उत्पल यांचा संबंध अद्याप आलेला नाही. राज्यातील सर्वच भागांत त्यांचा संपर्क नाही, हे जरी खरे असले तरी एक उदयोन्मुख आणि नव्या पिढीचा नेता म्हणून तो सुपरिचित होईल, यात शंका नाही.
स्व. मनोहर पर्रीकर यांच्यात काही गुणदोष होते, त्यांचे सर्वांशीच पटत असे, असे म्हणता येणार नाही, कारण आपलेच खरे यावर ते ठाम राहायचे, असा प्रत्यय अनेकांना अनेक वेळा आला असेल. त्यांच्या विचारांना पक्की बैठक होती. त्यांची विचारपद्धत आधुनिक बदलांवर भर देणारी होती. मुख्यमंत्री म्हणून असलेले अमर्याद अधिकार जनतेच्या कल्याणासाठी वापरायचा त्यांना ध्यास होता. ती धडाडी आणि जिद्द हेच त्यांचे वैशिष्ट्य होते. विरोधकांना नामोहरम करण्यापेक्षा त्यांना आपले म्हणणे पटवून ते गळी उतरविण्यात ते वाकबगार होते. त्यामुळे त्यांना क्रॉस करणे इतरांना शक्य होत नसे. एकाधिकारशाही त्यांच्या अंगात मुरली होती, अशी टीका होत असे; कारण त्यांच्या पातळीवर जाणे सहसा कोणाला जमत नसे. यापैकी किती गुण उत्पलमध्ये उतरले आहेत, हे सांगणे तसे अवघडच. तशी अपेक्षा गोमंतकीयांना नसेल किंवा असेल. एक मात्र खरे की उत्पल यांच्यातील तळमळ आणि विचारांची दिशा त्यांच्यात नेत्याचे गुण असल्याचे दाखवून देते. एखाद्याची स्तुती करण्याचा उद्देश यामागे नाही, पण नवा चेहरा, नवा नेता म्हणून उत्पल पर्रीकर पुढे आल्यास राज्यातील राजकारणाची दिशा बदलू शकेल. त्यांचे स्थानिक वृत्तवाहिनीवरील विचार काही वेळा ऐकायला मिळाले, त्यावेळी हे मत पक्के झाले. दुसरा पर्रीकर नको, हा दुराग्रह आहे. त्यामागे कोणतीही ठोस कारणे नाहीत.
पणजी महापालिकेचा कारभार असो किंवा राज्याचे राजकारण असो, उत्पल यांचे मतप्रदर्शन थेट आणि स्पष्ट आहे. पणजीचे किती नगरसेवक संपूर्ण पणजी महापालिका क्षेत्राला ठाऊक आहेत, किती मतदार सर्व नगरसेवकांना ओळखतात, यापासून ते नगरसेवक आपली मते व्यक्त करण्याच्या मानसिक स्थितीत आहेत का, हा गूढ प्रश्न पणजीकरांना सतावतो आहे. नेत्याच्या प्रचंड दडपणाखाली म्हणा किंवा दहशतीखाली म्हणा, नगरसेवक बोलत नाहीत. अल्पमतातील असोत किंवा बहुमतातील असोत, नगरसेवकांनी जनतेशी बोलायला हवे.
पाच वर्षांनी पुन्हा मतदारांकडे जाता येईल एवढी कर्तबगारी त्यांनी दाखवायला हवी. एखाद्या गटात बंदिस्त असल्यासारखे, एकाच नेत्याशी निष्ठा वाहिल्याप्रमाणे लोकप्रतिनिधी वागायला लागले तर जनतेने कोणाकडे पाहायचे? लोकप्रतिनिधी निवडले गेले ते जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोचविण्यासाठी. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी पारदर्शकता पाळायला हवी, बोलायला हवे. कोणत्या पद्धतीने पणजी पुढे नेली जात आहे, ते तरी सांगायला हवे.
स्मार्ट सिटीच्या कामात सर्वांनाच हात धुवून घेता आले नसतील, मोजक्यांनीच संधी साधली अशी चर्चा पणजीवासीयांत चालते. त्यात तथ्य असेल, नसेल पण आपण कोणत्या प्रकारे सावधगिरी बाळगत आहोत, कसा अंकुश ठेवत आहोत, हे सांगण्यासाठी तरी बोला. तेवढेही स्वातंत्र्य नसेल तर ती लोकशाहीची शोकांतिका ठरेल. सरकारचे दडपण आहे का, आमदारांचा धाक वाटतो का, असे प्रश्न विचारले जात आहेत. अखेरच्या क्षणी मतदारांकडे विकासकामांच्या बळावर मते मागण्याऐवजी पैशांची थैली सोडून याचना करण्याची वेळ आपल्यावर का येते? यावर भाजपच्या भाषेत सांगायचे तर चिंतन करा.
सध्या पणजीच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणाला नवे स्वरुप देण्याची गरज निर्माण झाली आहे. नवे नेतृत्व, नवी धोरणे, नवे विचार मांडणारे नेते समोर यायला हवेत. किती दिवस त्याच-त्याच चेहऱ्यांची तीच जुनी कामगिरी पाहाणार आहोत आपण.. सिद्धेश श्रीपाद नाईक, उत्पल पर्रीकर असे नेते विधानसभेत हवेत असे भाजपला का वाटत नाही? हृदयनाथ शिरोडकर, महेश म्हांबरे, डॉ. केतन भाटीकर, अमरनाथ पणजीकर असे युवानेते कधी निवडून येतील? गोव्यातील अन्य भागांतही नवी नावे चर्चेत आहेत, त्यांना राजकीय पक्षांनी पुढे आणायला हवे. युरी आलेमाव यांच्यासारखा विरोधी पक्षनेता चमकतोच आहे ना? विरेश बोरकर धडपडतो आहे ना? मग नवोदितांना संधी देण्याचा विचार राजकीय पक्षांनी आतापासूनच करायला हवा. ते पहिल्या कालावधीत अभ्यासात कमी पडतील, पद्धतीत मागे राहतील पण दुसरा कालावधी मिळाला तर नक्कीच गोव्याच्या कल्याणासाठी मुद्देसूद बोलतील.
पैशांनी मते विकत घेण्याची वेळ अशा नेत्यांवर येणार नाही. पैशांचा खेळ ज्यावेळी बंद होईल, तेव्हाच सच्चे लोकप्रतिनिधी विधानसभेत दिसतील. चोवीस तास स्वकल्याणाचा विचार ते करणार नाहीत, कारण त्यांना पुन्हा जनतेसमोर जायचे असेल. नव्यांना संधी द्या, तुम्ही केवळ मार्गदर्शकाची भूमिका बजावा, असे जनतेने मतयंत्रातून सांगण्यापूर्वी ज्येष्ठ नेत्यांनी पावले उचलावीत. सध्या विधानसभेत असलेल्या नेत्यांवर अधिक जबाबदारी द्यायला हवी. पूर्णवेळ राजकारणी, पण राजकारण हा व्यवसाय मानणारे नव्हेत असे लोकप्रतिनिधी हवे आहेत. ती काळाची गरज तर आहेच, राजकीय पक्षांचीही निकड आहे, हे कधी लक्षात घेतले जाईल?