प्रमाणपत्र अभ्यासक्रम होणार सुरू; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 13:58 IST2025-07-27T13:58:25+5:302025-07-27T13:58:59+5:30
सहा नवे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.

प्रमाणपत्र अभ्यासक्रम होणार सुरू; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी : गोवा उच्च शिक्षण संचालनालय (डीएचई) आणि कर व्यावसायिकांची राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त संस्था फाउंडेशन फॉर स्किल डेव्हलपमेंट (एफएसडी) यांच्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. यामधून सहा नवे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.
यावेळी उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर, फाउंडेशन फॉर स्किल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष सीए आलोक मेहता आणि उच्च शिक्षण संचालनालयातील कार्यक्रम संचालक डॉ. नियान मार्शेन आदी मान्यवर उपस्थित होते. या कराराच्या माध्यमातून गोव्यातील उच्च शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी व्यावहारिक, नोकरी-केंद्रित प्रमाणपत्र-मुक्त अभ्यासक्रमांची मालिका सुरू केली जाणार आहे.
कराराच्या माध्यमातून शैक्षणिक-उद्योग संबंधांना चालना मिळणार असून, विद्यार्थ्यांमध्ये रोजगारक्षमता आणि करिअरच्या अनुषंगाने उद्योग-संबंधित कौशल्ये वाढण्यास मदत होणार आहे. हा अभ्यासक्रम स्किल इंडिया मिशनशी सुसंगत आहे. ज्याचा उद्देश भरपूर मनुष्यबळाची गरज असलेल्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना करिअरची संधी प्राप्त व्हावी, यासाठी त्यांना व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
ऑनलाइन आणि ऑफलाइन चालणार अभ्यासक्रम
प्रत्येक अभ्यासक्रम ऑनलाइन आणि ऑफलाइन स्तरावर चालणार असून, त्याचा कालावधी ३० तासांचा असेल. हे अभ्यासक्रम वाणिज्य, अभियांत्रिकी आणि इतर विषयांमधील विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर सहभागींना फाउंडेशन फॉर स्किल डेव्हलपमेंट (एफएसडी) द्वारे जारी केलेले प्रमाणपत्र मिळेल.
एफएसडीद्वारे प्रमाणित प्रमाणपत्र अभ्यासक्रम
जीएसटी आणि उत्पन्न कर, भारतीय लेखा मानके, आंतरराष्ट्रीय कर आकारणी, प्रगत लेखा आणि टॅली प्राइम, व्यवसाय संप्रेषण आणि सार्वजनिक भाषण आणि संप्रेषण कौशल्ये, कृत्रिम बुद्धिमता (एआय) आदी अभ्यासक्रम फाउंडेशन फॉर स्किल डेव्हलपमेंट (एफएसडी) मार्फत सुरू केले जाणार आहेत.