पणजी : म्हादई पाणीप्रश्नी कर्नाटकने आपला डाव अखेर साधला असून गोवा सरकारला पूर्णपणे गाफील ठेवून म्हादई नदीच्या प्रवाहावर कर्नाटकने बांध बांधला आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनीही ही अत्यंत धक्कादायक व गंभीर गोष्ट असल्याचे सांगून बांधाचे काम पूर्ण झाले तर, म्हादई नदीचे पाणी गोव्यात येऊच शकणार नाही, अशी भीती व्यक्त केली आहे.यापूर्वी सर्वोच्च न्यायालयासमोर आणि पाणी तंटा लवादासमोरही कर्नाटकने जी हमी दिली होती, त्या हमीचे पालन केलेले नाही. कळसा-भंडुरा प्रकल्पाचे काम कर्नाटकने नव्याने सुरू केले आहे. म्हादई नदीच्या प्रवाहावर कर्नाटकने बांध बांधला आहे. या बांधाचे काम जोरात सुरू आहे. गोवा सरकारच्या यंत्रणोला याविषयी कोणतीच माहिती नव्हती. अजूनही यंत्रणा थोडी आरामातच आहे. अन्यथा शुक्रवारी तातडीने मुख्य सचिव तसेच जलसंसाधन खात्याचे मुख्य अभियंते वगैरे कर्नाटकच्या सीमेवर जिथे काम सुरू आहे, तिथे जाऊन आले असते, अशी चर्चा गोव्यात सुरू आहे. खुद्द अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नाडकर्णी हेही खूप नाराज झाले आहेत.यंत्रणा जेवढ्या गतीने सक्रिय व्हायला हवी तेवढ्या गतीने ती होत नाही, याची कल्पना देणारा एसएमएस नाडकर्णी यांनी सरकारला पाठवला असल्याची माहिती मिळाली. नाडकर्णी यांनी शुक्रवारी लोकमतशी बोलतानाही कर्नाटकने केलेला प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे व गोवा सरकारने तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. म्हादई बचाव अभियानाचे सचिव राजेंद्र केरकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली म्हणून कर्नाटकचे कृत्य दिसून आले. अन्यथा ते देखील कळले नसते याची कल्पना सरकारमधील काही घटकांना आली आहे.जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर यांनी मडगावमधील अभियंत्यांचे एक पथक घटनास्थळी शुक्रवारी पाठवले. त्यांनी पाहणी केली व फोटोही आणले आहेत. राजेंद्र केरकर यांनीही लोकमतशी बोलताना सगळा प्रकार खूप गंभीर असल्याचे व जलसंसाधन खात्याची यंत्रणा अधिक सक्रिय होण्याची गरज व्यक्त केली. येत्या 15 रोजी म्हादई पाणी तंटा लवादासमोर गोव्याच्या वतीने लेखी स्वरुपात बाजू मांडली जाणार आहे. तथापि कर्नाटकने बांध उभारण्याचे चालविलेले काम पाहता 15 तारखेपर्यंत खूप वेळ झालेला असेल. आत्माराम नाडकर्णी यांनाही याची कल्पना आली आहे. यापूर्वीही एकदा असाच प्रकार कर्नाटकने केला होता तेव्हा आम्ही तातडीने बेळगाव व खानापुरच्या जिल्हाधिका-यांशी बोललो होतो व तातडीने काम बंद करून घेतले होते, असे नाडकर्णी यांनी सांगितले.
हे तर महासंकट, कर्नाटकने डाव साधला, म्हादईचे पाणी गोव्यात येणे बंद होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 21:19 IST