केपे, सांगे, सत्तरीत पाणीबाणी
By Admin | Updated: April 14, 2015 01:57 IST2015-04-14T01:56:54+5:302015-04-14T01:57:16+5:30
पणजी : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच केपे, सांगे आणि सत्तरी या तीन तालुक्यांमधील गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे.

केपे, सांगे, सत्तरीत पाणीबाणी
पणजी : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच केपे, सांगे आणि सत्तरी या तीन तालुक्यांमधील गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. या भागांमध्ये टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने ७0 खासगी टँकर्स निविदा काढून कंत्राटावर
घेतले असून या तीन तालुक्यांमध्येच त्यातील निम्म्याहून अधिक टँकर्स लागत आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता दत्तात्रय बोरकर यांनी यास दुजोरा दिला. सुमारे ४0 टँकर्स या तीन तालुक्यांमध्येच लागतात. केपे तालुक्यात मोरपिर्ला, बार्से या गावांमध्ये सध्या टँकर्सद्वारेच पाणीपुरवठा होत आहे, असे ते म्हणाले. या भागात उन्हाळ्यात भूजल पातळी खाली जाते आणि विहिरींनाही पाणी नसते. जलवाहिन्या कमी व्यासाच्या असल्याने त्या फुटण्याचे प्रकार घडले तर ती आणखी एक डोकेदुखी बनते. या तालुक्यांमध्ये डोंगराळ भागातील लोकांना एप्रिल महिना सुरू झाला, की पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. या तीन तालुक्यांमध्ये ही स्थिती असली, तरी साळावली, अंजुणे या प्रमुख धरणांमध्ये पाण्याची पातळी समाधानकारक असल्याचा दावा बोरकर यांनी केला.
दरम्यान, उत्तर गोव्यात पर्वरी, ताळगाव भागांतही पाणी टंचाईची समस्या वरचेवर जाणवत आहे. (प्रतिनिधी)