उमेदवार निवड येत्या आठवड्यात
By Admin | Updated: January 8, 2016 01:46 IST2016-01-08T01:45:18+5:302016-01-08T01:46:35+5:30
पणजी : पणजी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवार निवडीसाठी इच्छुकांशी बोलणी सुरूच ठेवली आहेत.

उमेदवार निवड येत्या आठवड्यात
पणजी : पणजी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवार निवडीसाठी इच्छुकांशी बोलणी सुरूच ठेवली आहेत. प्रभागवार आपण चर्चा करत असून पुढील आठवडाभरात उमेदवार निवड पूर्ण होईल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
पर्रीकर हे आल्तिनो येथे शशिकला काकोडकर यांच्या निवासस्थानी गुरुवारी आले होते. काकोडकर यांना वाढदिनाच्या शुभेच्छा देऊन पर्रीकर परतत असताना पर्रीकर यांना महापालिका निवडणुकीविषयी विचारले असता, ते म्हणाले की उमेदवार निवडीसाठी आमची प्रक्रिया सुरू आहे. आपण विविध घटकांशी बोलत आहे. इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते व लोकांचे मत जाणून घेत आहे. अजून उमेदवार निवडले गेलेले नाहीत; पण येत्या आठवड्यात मी पुन्हा गोव्यात येईन तेव्हा महापालिकेसाठी उमेदवार निवड पूर्ण होईल.
दरम्यान, पर्रीकर यांच्यासोबत आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर हेही इच्छुक उमेदवारांशी व कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. भाजपच्या विद्यमान नगरसेवकांची व विरोधी गटातील नगरसेवकांची प्रगती याबाबतचाही अंदाज घेतला जात आहे. येत्या ६ मार्च रोजी महापालिका निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी ११ जानेवारी रोजी महापालिका क्षेत्रातील प्रभाग फेररचनेची प्रक्रिया पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)