मंत्रिमंडळ फेरबदल चतुर्थीपूर्वी?; दामू नाईक यांची बी. एल. संतोष यांच्याशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 08:08 IST2025-08-13T08:07:26+5:302025-08-13T08:08:25+5:30
रिपोर्ट कार्डेही तयार केल्याची माहिती त्यांना दिली.

मंत्रिमंडळ फेरबदल चतुर्थीपूर्वी?; दामू नाईक यांची बी. एल. संतोष यांच्याशी चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मंत्रिमंडळ फेरबदल चतुर्थीपूर्वीच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल दिल्लीत पक्षाच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेतली. दामू यांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याशी तासभर चर्चा केली व अधिवेशनातील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला. तसेच रिपोर्ट कार्डेही तयार केल्याची माहिती त्यांना दिली.
राष्ट्रीय सरचिटणीस संतोष यांनी काही गोष्टी बारकाईने जाणून घेतल्या. प्राप्त माहितीनुसार पहिल्या टप्प्यात दोन आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल. त्यासाठी दिगंबर कामत व रमेश तवडकर यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. काँग्रेसमधून फुटून आलेल्या आठ आमदारांपैकी दिगंबर कामत यांचे मंत्रिपद गेला बराच काळ रखडले आहे. आज होईल, उद्या होईल या आशेवर ते आहेत. परंतु आता ती वेळ आलेली असल्याची माहिती मिळाली आहे.
गोविंद गावडे यांना डच्चू दिल्याने त्यांची जागा रिकामी आहे. मुख्यमंत्र्यांकडे सुमारे २४ खाती आहेत. दोघांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचे झाले तर आणखी एकाला वगळावे लागेल. पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा हे आजारातून बरे तसे अजून झालेले नाहीत. विधानसभा अधिवेशनात त्यांनी उपस्थिती लावली. परंतु त्यांच्या खात्यांच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला सभागृहात मुख्यमंत्र्यांनीच उत्तर दिले. आजारपणामुळे सिक्वेरा यांना वगळले जाण्याची शक्यता आहे.
'लोकमत'ने दामू नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राजकीय गोष्टींवर संतोष यांच्याशी चर्चा झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. परंतु अधिक काही सांगण्याचे टाळले. ते म्हणाले की, 'मंत्रिमंडळाचा विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येतो. त्यामुळे मी यावर भाष्य करू इच्छित नाही. मुख्यमंत्रीच काय ते सांगतील. संतोष यांच्याकडे संघटनात्मक बाबींवर मी सखोल चर्चा केलेली आहे.'
मंत्री कामच करत नाहीत : लोबो
म्हापसा : राज्यात मंत्री असताना, प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्रीच देतात. प्रत्येक विषयाची हाताळणी तेच करतात. यावरून मंत्र्यांकडून अपेक्षित काम योग्य प्रकारे होत नसल्याचे स्पष्ट होते अशी टीका कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केली. मंत्र्यांनी आपली कामे योग्यरीतीने करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कळंगुट येथे बांदोडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आमदार लोबो यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सध्या प्रत्येक प्रश्नाला मुख्यमंत्रीच उत्तर देतात आणि मंत्री काम करत नाहीत. मंत्र्यांनी चांगल्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे.