केरळ, तामिळनाडूतही भाजपची सत्ता येईल; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:19 IST2025-04-08T13:18:38+5:302025-04-08T13:19:33+5:30
भाजपचे संघटन उभारण्यास अटल बिहारींचे मोठे योगदान

केरळ, तामिळनाडूतही भाजपची सत्ता येईल; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : देशभरात भाजपचे संघटन उभारण्यास अटल बिहारी वाजपेयी यांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन करुन येत्या दहा वर्षात केरळ, तामीळनाडूतही भाजप सत्ता स्थापन करील, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. अटल स्मृती संमेलनात ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार दिगंगर कामत, माजी आमदार दयानंद मांद्रेकर, माजी महिला मोर्चा अध्यक्ष कुंदा चोडणकर, माजी उपसभापती नरहरी हळदणकर, सुभाष साळकर, गोविंद पर्वतकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, अटलर्जीनी राष्ट्र प्रथम भावनेने समर्पितपणे काम केले. रा. स्व. संघ, जनसंघ व भाजपच्या कामात स्वतःला वाहून घेतले. श्रीपाद नाईक म्हणाले की, की अटलजींचे विचार आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. काँग्रेसने नेहमीच व्होट बँकेचे राजकारण केले ठराविक वर्गाचेच तुष्टीकरण केले. त्याचे परिणाम आजही देशाला भोगवे लागत आहेत.
अटलजींच्या काळात काम केलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री रामराव देसाई हेही याप्रसंगी उपस्थित होते. मुख्यमंत्री शेवटी म्हणाले की, अटलजींच्या काळात काम केलेल्या सर्वांपर्यंत पोचणे कदाचीत शक्य झाले नसेल. कोणी चुकून राहिले असतील तर त्यांना अटलजींची फोटो फ्रेम पाठवून दिली जाईल.' संमेललनास मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.