भाजप 'मंत्री, आमदारांची विधानसभेतील कामगिरी तपासणार: दामू नाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 10:01 IST2025-07-15T10:00:27+5:302025-07-15T10:01:10+5:30
भाजपच्या प्रत्येक आमदाराने पक्षाची शिस्त पाळायलाच हवी, याचा दामू यांनी पुनरुच्चार केला.

भाजप 'मंत्री, आमदारांची विधानसभेतील कामगिरी तपासणार: दामू नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क. पणजी : भाजप मंत्री, आमदारांचा विधानसभेतील कामगिरी तपासणार, असे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर स्पष्ट केले. पत्रकारांशी बोलताना दामू म्हणाले की, विधानसभेत मंत्री, आमदार कशी कामगिरी करतात यावर पक्षाचे बारकाईने लक्ष राहील. २१ जुलै ते ८ ऑगस्ट असे एकूण पंधरा दिवस कामकाज चालणार आहे. पक्षाच्या आमदार, मंत्र्यांची किती उपस्थिती असते हेही तपासले जाईल.'
मंत्रिमंडळ फेररचनेबद्दल विचारले असता ते म्हणाले की, 'आता विधानसभा अधिवेशन संपल्याशिवाय एवढ्यात काहीच होणार नाही. सत्ताधारी आमदार, मंत्री अधिवेशनावरच लक्ष केंद्रित करुन आहेत.'
कोअर कमिटीच्या काल झालेल्या बैठकीत अॅपधारित टॅक्सीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अकरा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. येत्या सोमवारपासून सुरु होणार असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांना कसे हाताळावे यावरही चर्चा झाली. टॅक्सी अॅपला होणारा वाढता विरोध लक्षात घेता कोअर कमिटीने वरील समिती स्थापन केली.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की,' विधानसभा अधिवेशनाच्या निमित्ताने वेगवेगळे विषय होते. जनतेच्या विषयांना पक्ष प्राधान्य देत आहे.' भाजपच्या प्रत्येक आमदाराने पक्षाची शिस्त पाळायलाच हवी, याचा दामू यांनी पुनरुच्चार केला.