पांडुरंग मडकईकरांच्या भूमिकेवर भाजपमध्ये चर्चा होणार; कोअर कमिटी घेणार आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 07:29 IST2025-03-10T07:28:14+5:302025-03-10T07:29:42+5:30
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता ते म्हणाले की, भाजपमध्ये बेशिस्तीला मुळीच थारा नाही. कोणीही पक्षाला गृहित धरू नये.

पांडुरंग मडकईकरांच्या भूमिकेवर भाजपमध्ये चर्चा होणार; कोअर कमिटी घेणार आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी एका मंत्र्याने आपल्याकडून २० लाख रुपये उकळल्याचा जो आरोप केला, त्याची गंभीर दखल भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने घेतली आहे.
मडकईकर हे पक्षाकडे न येता थेट प्रसारमाध्यमांकडे बोलल्याने या बेशिस्तीची चौकशी केली जाणार आहे. त्याचबरोबर सरकारविरोधात बोलणाऱ्या काही सत्ताधारी आमदारांनाही बेशिस्तीबाबत समज दिली जाणार आहे.
पक्षातील सूत्रांनी यास दुजोरा दिला. मडकईकर हे आपण सत्ताधारी पक्षात आहोत हे विसरले की काय?, असा प्रश्न भाजपचे काही कार्यकर्ते करत आहेत. लवकरच कोअर कमिटीच्या बैठकीतही या प्रश्नावर गंभीरपणे चर्चा केली जाणार असून, संबंधितांना कडक शब्दांत समज दिली जाईल, असे ठरविण्यात आले आहे.
पक्षाला गृहित धरू नये
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता ते म्हणाले की, भाजपमध्ये बेशिस्तीला मुळीच थारा नाही. कोणीही पक्षाला गृहित धरू नये. मडकईकर यांची काही तक्रार होती तर त्यांना पक्षाचे व्यासपीठ खुले होते. ते थेट प्रसारमाध्यमांकडे गेले. मडकईकर या विषयावर अद्याप मला भेटलेले नाहीत किंवा माझ्याकडे तक्रारही केलेली नाही. मडकईकर स्वतःला भाजपचे जुने कार्यकर्ते म्हणवून घेतात तर त्यांना पक्षशिस्त ठाऊक असायला हवी.'
तर अवश्य जावे
दरम्यान, मडकईकर यांनी २०२७ च्या निवडणुकीसाठी कुंभारजुवेंतून भाजपचे तिकीट आपल्याला मिळावे यासाठी आग्रही आहेत. आठ दिवसांत काय तो भाजपने निर्णय घ्यावा, नपेक्षा अन्य पक्ष माझ्या संपर्कात आहेत, असेही ते म्हणाले होते. त्यावर, 'मडकईकर जर इतरत्र कुठे जात असतील तर त्यांनी अवश्य जावे, अशीही भूमिका भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी घेतल्याचे समजते.